Serial Murder Case | सीरियल किलर ! File Photo
क्राईम डायरी

Serial Murder Case | सीरियल किलर !

पुढारी वृत्तसेवा

अशोक मोराळे, पुणे

एका महिन्यात त्याने दोन खून केले. खून करताना तो आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी व्हिडीओ काढायचा. जामखेडमधील खून पचल्यानंतर त्याने सासवडमध्ये देखील एकाचा खून केला. त्याचेसुद्धा मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि सासवड पोलिसांनी कौशल्यपुर्वक तपास केला आणि अखेर विकृत मनोवृत्तीच्या या सीरियल किलरला बेड्या ठोकल्या.

9 डिसेंबरचा तो दिवस होता. सकाळचे अकरा वाजले होते. सासवड शहरातील एका वाईन्सच्या मागील बाजूला एक बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर जिन्याखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. सासवड पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाहताच पोलिसांच्या लक्षात आले की, या व्यक्तीचा खून झालाय. काही वेळातच खुनाची बातमी सासवड शहरात वार्‍यासारखी पसरली. पोलिसांनी चौकशी केली, खबर्‍यांना अलर्ट केले. त्यावेळी हा मृतदेह राजू दत्तात्रय बोराडे (38, रा. म्हाडा कॉलनी, सासवड) याचा असल्याचे समोर आले.

राजू याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सासवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. राजू याची ओळख पटली होती. आता पोलिसांसमोर खुन्याला पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. पोलिस उपनिरीक्षक गोडसे आणि त्यांचे पथक खुन्याच्या मागावर होते. गोडसे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले; तर दुसरीकडे राजू याची पार्श्वभूमी तपासली. त्यावेळी पोलिसांच्या हाती एक धागा लागला. राजू याला दारूचे व्यसन असून, तो आक्रमक स्वाभावाचा होता. तसेच त्याचे अनेक लोकांशी वाद होते. त्याचवेळी सीसीटीव्ही फुटेजवर लक्ष ठेवून पडताळणार्‍या पोलिसांच्या निदर्शनास दोन व्यक्ती राजू याच्यासोबत घाटे यांच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीकडे जाताना दिसल्या. त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद होत्या. पोलिसांनी दोघांना अचूक हेरले.

त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून कोंढवा, हडपसर परिसरात शोध घेतला. त्याचवेळी पोलिस कर्मचारी अक्षय चिले यांना एका वाईन्समध्ये एक व्यक्ती दारू विकत घेण्यासाठी येताना दिसली. त्याचे वर्णन त्या दोन संशयित व्यक्तीपैकी एकाशी मिळते जुळते होते. त्याचे नाव सुरजप्रकाश निषाद होते. तो मूळचा छत्तीसगडचा राहणारा. बांधकाम मजूर म्हणून तो येथे काम करत होता. सुरुवातीला सुरजप्रकाश याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा बनाव जास्त काळ टिकून राहिला नाही. पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. नीरज गोस्वामी (रा. मध्य प्रदेश) आणि त्याने मिळून राजू याचा खून केल्याचे सांगितले.

सूरजप्रकाश आणि निरज दोघे पोलिसांच्या ताब्यात होते. चौकशी त्यांनी सांगितले, 8 डिसेंबर रोजी हे दोघे आरोपी दारु पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी राजू तेथे गेला. दारु पिण्यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी राजू याने त्याच्याकडील चाकू काढून या दोघांना धमकावले. त्या कारणातून सूरजप्रकाश आणि निरज चिडले. त्यांनी राजू याला दारू पाजली. बांधकाम सुरू असलेल्या त्या इमारतीवर ते राजूला घेऊन गेले. तेथे चाकूने वार करून राजूचा खून केला. नीरज राजूचा खून करत असताना, सूरजप्रकाश याने मोबाईलमध्ये याचा व्हिडीओ केला.

पोलिसांना नीरज जरा विक्षीप्त वृत्तीचा वाटत होता. त्याचं वर्तन जरा वेगळचं होतं. पोलिसांनी सूरजप्रकाश याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने सांगितले, नीरज याने जामखेड येथे सुद्धा एका व्यक्तीचा किरकोळ वादातून खून केला आहे. त्याचा सुद्धा त्याने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून ठेवलाय. पोलिसांनी नीरज याचा मोबाईल तपासला तेव्हा त्यांना एका व्यक्तीचा तो खून करत असल्याचा व्हिडीओ मिळून आला.

सासवड पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता, जामखेड पोलिसांना ही माहिती दिली. त्यांनी विकास अंधारे (वय.22) या व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूची नोंद असल्याबाबत सांगितले. नीरज याने दिलेली माहिती आणि मृत व्यक्तीची माहिती जुळून आली. त्यावेळी नीरज याने पैसे आणि किरकोळ वादातून 24 नोव्हेंबर रोजी विकास अंधारे यांचा खून केल्याचे समोर आले. अंधारे यांचा खून केल्यानंतर पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून हे दोघं दहा-बारा दिवसापुर्वीच सासवड येथे कामासाठी आले होते. येथे आल्यानंतर देखील नीरज आणि त्याचा साथीदार सुरज प्रकाश या दोघांनी राजू यांचा खून केला. सवयीनुसार नीरज याने त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. सासवड आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसात सासवडमधील खूनाचा छडा तर लावलाच, मात्र जामखेड येथील खुनाचा उलगडा करून सिरियल किलर नीरज आणि त्याचा साथीदार सूरजप्रकाश याला गजाआड केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT