मनमाड (नाशिक) : पुणे–जम्मूतावी झेलम एक्स्प्रेसच्या जनरल बोगीत झालेल्या चोरी प्रकरणी दोन पुरुष व एका महिलेसह तिघांना जळगाव रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी शिताफीने पकडले. त्यांच्या ताब्यातून तीन मोबाइल व रोख रक्कम मिळून सुमारे ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राकेशकुमार गौतम (रा. कबीर नगर, खलीदाबाद, उत्तरप्रदेश) व अन्य प्रवासी झेलम एक्स्प्रेसने मनमाडहून प्रवास करत होते. गाडीत झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मनमाड–चाळीसगाव दरम्यान तीन मोबाइल व साडेअकरा हजार रुपये रोख रक्कम चोरली. प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी जळगाव स्थानकात पोलिसांना कळविले.
गाडी थांबताच हे तिघे प्लॅटफॉर्मवर उतरून पळण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना पकडले. अंगझडतीत चोरीचा ऐवज मिळून आला. लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी संशयित करण गुलाब चव्हाण (२३), सचिन दशरथ चव्हाण (२८) व एक महिला (रा. छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली. प्रकरणाचा तपास सहाय्यक उपनिरीक्षक हेमराज आंबेकर करीत असून, लोहमार्ग निरीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.