Crime news | बार्शीत रंगला 'सिने स्टाईल' सूडनाट्य! मेसेज करणाऱ्याचा काटा काढण्यासाठी पतीचा थरार 
क्राईम डायरी

Crime news | बार्शीत रंगला 'सिने स्टाईल' सूडनाट्य! मेसेज करणाऱ्याचा काटा काढण्यासाठी पतीचा थरार

पुढारी वृत्तसेवा

गणेश गोडसे, बार्शी

सोलापूरच्या बार्शीत एखाद्या चित्रपटातील कथेला अगदी हुबेहूब शोभेल असाच काहीसा प्रकार घडला आहे. पत्नीला मेसेज करण्याच्या संशयाच्या कारणावरून सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील एका गावात अनेकांच्या नजरेसमोर एकाने बंदुकीतून दोनदा बार उडवला. अचानक गावामध्ये बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज कानावर पडल्याने ग्रामस्थ ही भयभीत झाले होते.

आपल्या बायकोला कोणीतरी सोशल मीडियावरून वारंवार मेसेज करीत असल्याचा राग पुण्यातील योगेश या तरुणाच्या डोक्यात होता. हळूहळू त्याने ते मेसेज करणार्‍याचा माग काढला. तो मेसेज पाठविणारा बाळासाहेब नावाचा तरुण आपल्या पत्नीच्या माहेरचा असल्याचाही त्याला सुगावा लागला होता आणि त्याचा कायमचा काटा काढायचा प्लॅन त्याने केला. आपल्या समवेत पुणे येथील राहुल व रोशन या दोन मित्रांना हा प्लॅन सांगून त्यांना यामध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर पत्नीच्या माहेरच्या गावातील अविनाश नावाच्या एका मित्राची योगेशने याकामी मदत घेतली. अविनाश हा मेसेज पाठविणार्‍या बाळासाहेबाचाही मित्र होता. त्यामुळे अविनाश याला बाळासाहेब याचा ठाव ठिकाणाची माहिती काढण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानुसार अविनाश यानेही योगेश याचा शब्द प्रमाण मानून बाळासाहेब याला फोन करून तो कोठे आहे, याचा अंदाज घेऊन बाळासाहेब या तरुणाला आपल्याला येरमाळा येथे जायचे आहे, असे सांगून त्याला घरीच थांबण्यास सांगितले. त्यानंतर ही माहिती योगेश याला सांगण्यात आली.

त्यानंतर योगेश व त्याचे मित्र थेट पुणे येथून अडीचशे किलोमीटर अंतर पार करत येऊन मेसेज केलेल्या बाळासाहेबाच्या गावी पोहोचले होते. त्याच्या थेट घरी जाऊन योगेश व त्याच्या दोन मित्रांनी घरातील अंगणामध्ये पलंगावर झोपलेल्या त्या तरुणाला लोखंडी अँगलने बेदम मारहाण केली. योगेश याच्या मित्राने तर एकदा नव्हे तर दोनदा गोळीबार करत, बाळासाहेब याच्या भावाच्या छातीवर पिस्तूल रोखून धरत सिने स्टाईल पद्धतीने दहशत निर्माण केली. एवढेच नाही तर मेसेज केलेल्या त्या तरुणाच्या भावालाही गाडीमध्ये घालून पळवून नेण्याचा प्रयत्न त्या पिस्तूलधारी तरुणांनी केला. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्याच्या चुलत्याने त्याला सुखरूप गाडीतून खाली उतरवले.

या घटनेची पार्श्वभूमी अशी की, बाळासाहेबाची व त्याच्याच गावातील एका मुलीची बार्शी येथे पोलिस भरती प्रशिक्षण देणार्‍या अ‍ॅकॅडमीमध्ये ओळख निर्माण झाली होती. हळूहळू त्यांच्या त्या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये होत होते. त्या दोघांमधील प्रेमाचा अंकुर आकाराला येत होता. त्यांच्यात जवळीक वाढत असतानाच दोघांच्या प्रेमाला नियतीची नजर लागली. त्या तरुणीच्या नातेवाईकांनी त्या तरुणीचे हात पिवळे करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या घरच्या लोकांनी व पै-पाहुण्यांनी त्या विवाह योग्य झालेल्या तरुणीचा विवाह पुणे येथील तरुणा बरोबर लावून देण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे दोघांच्याही मनाला वेदना होत होत्या. विवाहानंतर दोघांनी एकमेकांना विसरण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, मन ते मान्य करण्यास तयार नव्हते. त्या विवाहित तरुणीच्या पतीच्या मनात पत्नीला येणार्‍या मेसेजबाबत शंका निर्माण झाली. त्यामुळे पतीच्या रागाचा पारा चढत गेला व त्याने आपल्या इतर मित्रांच्या मदतीने धाडशी विचार करून तो प्रत्यक्षात आणण्यासाठी पाऊल उचलल्याने गोळीबाराची घटना घडली. सुदैव म्हणून त्या गावात गोळीबार झाला; मात्र कोणाचा बळी गेला नाही. तपास अधिकारी दिलीप ढेरे, बालाजी वळसने, सिद्धेश्वर लोंढे, राजेंद्र मंगरुळे यांनी ही तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या काही तासांत तिघांचा माग काढून त्यांच्या मुसक्या आवळल्या असून, तिघेजण जेलची हवा खात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT