दोन्ही कुटूंबियांच्या संमतीने लग्न ठरले. 12 मार्च लग्नाची तारीख होती. पाहुण्या-रावळ्यांना निमंत्रण धाडण्यात आली. नियोजित वधु-वरांचे सासवड परिसरात प्री-वेडिंग शुटींगदेखील पार पडले. मात्र, नवरीच्या मनात वेगळाच डाव सुरू होता. तिला काही होणारा नवरा पसंत नव्हता. त्यामुळे तिने त्याला आपल्या वाटेतून कायमचे दुर करण्याचा डाव रचला. परंतू तरुणाचे नशीब लवत्तर म्हणून तो वाचला. यवत पोलिसांच्या तपासात खूनी डावाचा हा भयानक प्रकार समोर आलाय....
विजय मुळचा कर्जत तालुक्यातील. बाणेर येथील एका पिझ्झा हॉटेलमध्ये नोकरी करतो. श्रीगोंदा तालुक्यातील सुनिता सोबत त्याचा विवाह ठरला. सुनिता सोबत तो आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवू लागला होता. 12 मार्च लग्नाची तारीख ठरली. दोघांनी आपले प्रिवेडींग शुट केले. त्याच कालावधीत विजयला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आले. मात्र त्याने त्याच्याकडे काही फारसे लक्ष दिले नाही. परत विजयला त्या क्रमांकावरून फोन आला. ‘तू सुनिता सोबत लग्न करु नको, त्याचे परिणाम वाईट होतील, मी तीचा बॉयफ्रेन्ड बोलतोय’. विजयला त्याच्या गावाचे नाव घेऊन ही धमकी देण्यात आली होती. हा प्रकार त्याने सुनिताच्या भावांच्या कानावर घातला. परंतू त्यावेळी सुनिताने आपले असे काही नाही, हवं तर तुम्ही चौकशी करा असे सांगून वेळ मारून घेतली.
सुनीता आता शांत डोक्याने डाव टाकू लागली होती. काही करून तिला आपल्या वाटेतून विजयला दुर करायचे होते. धमकी दिल्यानंतर सुद्धा तो धजत नाही हे लक्षात आल्यानंतर तिने शेवटचा डाव टाकण्याची तयारी केली. तो डाव होता, विजयचा रस्त्यावर अपघात घडवून खून करण्याचा. त्यासाठी तिने आपल्या ओळखीच्या एका व्यक्तीची मदत घेतली. तोच यातील मास्टरमाईंड. त्याने तिघांना दिड लाख रुपयांना विजयच्या खूनाची सुपारी दिली. सुनिताने पंधरा हजार रुपये तर त्या व्यक्तीने 1 लाख 35 हजार असे दिड लाख रुपये एकत्र करून तिघा मारेकर्याना देण्यात आले.
ठरल्याप्रमाणे 27 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास तिने विजयला फोन करून पुण्याला चित्रपट पाहण्यास जावू असे सांगितले. होणार्या बायकोचा फोन आल्यानंतर विजय दुपारी दिड वाजताच्या सुमारास दौंड येथे पोहोचला. सुनिता तिच्या नातेवाईकांकडे आली होती. दोघेजण दुचाकीवरून पुण्यात आले, चित्रपट पाहिला. सायंकाळी सव्वा सात वाजता विजय सुनिताला तिच्या नातेवाईकांच्या घरी सोडून परत पुण्याकडे निघाला. विजय आनंदात होता. परंतू त्याला काय माहिती आपल्यासाठी सुनिताने सापळा लावलाय. तो अलगद त्या सापळ्यात आता अडकला होता.
पुणे-सोलापूर रस्त्यावर खामगाव फाटा येथे अचानक एक चारचाकी गाडी त्याच्या दुचाकीसमोर येऊन थांबली. गाडीतून दोघे मारेकरी उतरले. त्यांनी दांडक्याने विजयला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मोठ्याने ओरडत विजयने मारण्याचे कारण विचारले. त्यावेळी एकाने सांगितले, ‘याचा पाय मोडा याला लग्नात उभे राहता नाही आले पाहिजे. तु सुनितासोबत लग्न केले तर दाखवतो’ असे म्हणत लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर मारेकर्यानी तेथून पळ काढला.
तेथील काही लोकांनी विजयला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याने हा प्रकार सुनिताला सांगितला. त्याला काय माहिती सुनितानेच त्याचा गेम करण्याचे ठरवले होते. तिनेच सुपारी दिलेल्या मारेकर्यानी त्याचे हे हाल केले होते. साळसुदाप्रमाणे सुनिता विजयला पाहण्यासाठी आपल्या नातेवाईकांसोबत रुग्णालयात आली होती.
यवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस देखील बुकळ्यात पडले होते. परंतू त्यांना या गुन्ह्याचा छडा लावायचा होता. पोलिसांनी विजयला विश्वासात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने सुरुवातीला आपल्याला एका फोनवरून सुनितासोबत तू लग्न करायचे नाही अशा धमकीचा फोन आल्याचे सांगितले. पोलिसांच्या हाती आता काहीतरी लागले होते. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषनाद्वारे आणि खबर्यांचे जाळे. पोलिसांनी शेवटी धागा शोधलाच. त्यांना फोन करणार्या तरुणाची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने सुनिताच्या कृत्याचा पाढाच वाचण्यास सुरूवात केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, सुपारी देणार्या व्यक्तीपर्यंत पोलिस पोहचलेच, त्याला सुतासारखा सरळ करताचा त्याने सुपारी घेणार्या मारेकर्याची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांना देखील बेड्या ठोकल्या. पाच जणांच्या चौकशीतून सुनिता हिने दिड लाख रुपयांना विजयच्या खूनाची सुपारी दिल्याचे पुढे आले. कारण काय तर तिला त्याच्यासोबत लग्न करायचे नव्हते. होणार्या नवर्याच्याच खूनाची सुपारी तरुणीने दिल्याचे पाहून पोलिस चक्रावले. सद्या सुनिता फरार आहे.