बोपदेव घाटातील नराधम!  pudhari photo
क्राईम डायरी

बोपदेव घाटातील नराधम! अंगाचा थरका उडविणारी घटना

पुढारी वृत्तसेवा
अशोक मोराळे, पुणे

खरं तर अंगाचा थरका उडविणारी ही घटना आहे. गुरुवारी (दि. 3 ऑक्टोबर) एक तरुणी आणि तिचा मित्र दुचाकीवरून बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी रात्रीचे पावणेअकरा वाजले असतील. दोघे टेबल पॉईंटवर फिरत होते. पंधरा मिनिटांनंतर तिघे नराधम तेथे आले. त्यांनी मद्यप्राशन केले होते. एकाच्या हातामध्ये लाकडी बांबू, दुसर्‍याच्या हातात कोयता तर तिसर्‍याच्या हातात चाकू होता. तिघांनी तरुणीच्या मित्राला ‘तू एवढ्या रात्री येथे काय करतो...’ असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणीला देखील ‘एवढ्या रात्री मुलासोबत काय फिरतेस’, असे म्हणत धमकावले. यानंतर तरुणीकडील दागिने काढून घेतले. पुढे तरुणी आणि तिच्या मित्राला काही अंतरावर पठाराच्या उताराच्या दिशेने घेऊन गेले. (Bopdev ghat gangrap case)

तरुणीच्या मित्राला तिघांनी परत शिवीगाळ केली, तर तरुणीला लाकडी बांबूने मारले. कोयता हातात घेतलेल्या नराधमाने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी तिच्या मित्राचे हात शर्टाने बांधून पाय बेल्टने बांधले. मित्राला मारहाण केली. यानंतर कोयता हातात असलेला नराधम तरुणीला टेबल पाईंटच्या खालील बाजूस घेऊन गेला. तरुणीने त्याला विरोध करत ‘तुम्हाला काय बोलायचे ते इथेच बोला’, असे म्हटले.

तरी देखील त्याने तरुणीला जबरदस्तीने खाली ओढले. तरुणीसोबत त्याने बळजबरी करण्यास सुरुवात केली. तरुणीने विरोध केला. त्यावेळी त्या नराधमाने तिच्या मित्रांना मारून टाकण्यास सांगेल, अशी धमकी दिली. तरुणी जीवाच्या अकांताने टाहो फोडत होती, मात्र डोक्यात सैतान संचारलेल्या त्या नराधमाने तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला.

तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य देखील केले. तरुणी प्रत्येकवेळी त्याला विरोध करत होती, मात्र तो सतत तिच्या मित्राला मारून टाकण्याची धमकी देत होता. तरुणी हात जोडून त्यांना आम्हाला सोडून देण्याची विनंती करत होती, मात्र त्यानंतर देखील दुसर्‍या नराधमाने तिच्यासोबत अत्याचार केला. त्यानंतर हातात चाकू असलेल्या तिसर्‍या नराधमाने देखील हेच कृत्य केले. यानंतर पहिल्या नराधमाने तरुणीवर पुन्हा अत्याचार केला.

तरुणीवर अत्याचार केल्यानंतर कोयताधारी नराधम तिला मित्राजवळ घेऊन आला. ‘याबाबत कोणाला काही सांगितले तर तुम्हाला आम्ही जीवे ठार मारू’, अशी धमकी दिली. ‘आम्ही जो पर्यंत तुम्हाला आवाज देत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर पडायचे नाही, जागेवरच थांबायचे’, असे सांगितले. वेदनेने विव्हळत मित्रासोबत तरुणी तेथेच थांबली.

जवळपास पंधरा मिनिटे दोघे तसेच थांबून होते. काही वेळानंतर तरुणीने मित्राचे हातपाय बांधलेले सोडले. यानंतर तरुणी आपल्या घरी आली. तिच्यासोबत झालेला प्रकार बहिणीला सांगितला. पुढे तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

दुसर्‍या दिवशी सकाळी या घटनेने पुण्यात खळबळ उडाली होती. पोलिसांची पथके आरोपींचा माग काढत होती, मात्र बोपदेव घाटातील भौगोलिक रचना, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा अभाव, मोबाईलला नसलेली रेंज अशा अनेक बाबी पोलिसांच्या तपासात अडचणी निर्माण करत होत्या. शिवाय आरोपींनी त्यांचे मोबाईल वापरले नव्हते. एकप्रकारे त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्याची सर्व खबरदारी घेतली होती.

घडलेल्या घटनेला आता सात दिवस झाले होते. अद्याप आरोपी मोकाट होते. दिवसेंदिवस पोलिसांवरील तपासाचा ताण वाढत चालला होता. पोलिस देखील आता ईर्ष्येला पेटले होते. काही झाले तरी नराधमांना बेड्या ठोकायच्या हे त्यांनी मनाशी पक्के केले होते. प्रत्येक दिवशी पोलिस कसून तपास करत होते. प्रत्येक शक्यता गृहीत धरून डाव टाकला जात होता, मात्र काही केल्याने आरोपी गळाला लागत नव्हते.

दरम्यान, गुरुवारी गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत होते. यावेळी पोलिसांनी उलट तपासाला सुरुवात केली होती. सासवड परिसरातील एका पेट्रोल पंपावर तिघे व्यक्ती जाणारी एक दुचाकी कॅमेर्‍यात दिसली. पोलिसांना आता एक संशयित व्यक्ती नजरेस पडला होता. तोच धागा पकडत त्यांनी पुढे कॅमेरे पाहिले. काही अंतरावर वाईनशॉपमध्ये पाच व्यक्ती मद्यप्राशन करताना पोलिसांना दिसल्या. पेट्रोल पंपावरील तीन व्यक्ती सुद्धा त्या कॅमेर्‍यात दिसत होत्या. यातील एक व्यक्ती पायाने लंगडत चालत होती. त्याची चालण्याची लकब हेरून पोलिसांनी त्याला शोधून काढले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत एका आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली.

त्याचा फोटो पीडितेला दाखवताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला. तिने त्याला ओळखले होते. यानंतर पोलिसांनी आपले खबरे कामाला लावून येवलेवाडी परिसरातून 25 वर्षीय पहिल्या नराधमाला बेड्या ठोकल्या. आतापर्यंत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एक नराधम मात्र अद्याप फरारच आहे, पण शेवटी पोलिस त्याचाही छडा लावल्याशिवाय राहणार नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT