काही स्थानिक तरुण वेगवेगळ्या आमिषांना भुलून आणि वंशवादाच्या विकारातून दहशतवादाकडे वळताना दिसत आहेत. pudhari photo
क्राईम डायरी

चिंताजनक! दहशतवाद पुण्याच्या वेशीवर!

पुढारी वृत्तसेवा

अशोक मोराळे, महेंद्र कांबळे, पुणे

गेल्या दोन-तीन वर्षांत पुणे परिसरात अशा काही घटना उघडकीस आल्या आहेत की, ज्या विचारात घेता आंतरराष्ट्रीय दहशतवाद आता पुण्याच्या वेशीवर दाखल झाल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. काही स्थानिक तरुण वेगवेगळ्या आमिषांना भुलून आणि वंशवादाच्या विकारातून दहशतवादाकडे वळताना दिसत आहेत. पुण्यासारख्या ख्यातकीर्त शहराच्या द़ृष्टिकोनातून ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. हा दहशतवाद पुण्याच्या भूमीत फोफावण्यापूर्वीच त्याची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे...

जुलै 2023 मध्ये दुचाकी चोरी करताना कोथरुड पोलिसांनी तिघांना पकडले. चौकशीत ते तिघे ‘अल-सुफा’ या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे समोर आले. खरं तर अनेक दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांच्या मागावर होत्या. पुढे पुणे पोलिस, दहशतवादविरोधी पथक (एटीएस), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांनी संयुक्त तपास करत इसिसची (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया) भारतातील पाळेमुळे खोदून काढताना परदेशातील इसिसची लिंकही समोर आणली.

तत्कालीन पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ देशातील सर्व तपास यंत्रणांना अलर्ट केले. त्यांच्याच कारवाईमुळे देशात विविध ठिकाणी कारवाई करत अनेक दहशतवाद्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. प्रामुख्याने या कारवाईत केंद्रस्थानी राहिले ते पुणे, मुंबई, ठाणे, पालघर तसेच कोल्हापूर, सातारा, सासवड, रत्नागिरी ही शहरेही रडारवर आली. एनआयएच्या तपासातून पुढे आलेल्या माहितीनुसार व त्यांच्याकडून आढळून आलेल्या स्फोटके तयार करण्याच्या साहित्यानुसार हे दहशतवादी देशभरात 26/11 पेक्षा मोठे घातपाती कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. या मॉड्यूलचा पर्दाफाश खर्‍या अर्थाने पुणे पोलिसांनी केला.

मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय 24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) अशी दोघांची नावे. तर त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शहनवाज आलम (वय 31) हा पसार झाला. पुढे मोहम्मद याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पकडले. हे दहशतवादी मूळचे मध्य प्रदेशातील रतलामचे.

स्फोटके बाळगल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. राजस्थानमधील जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत ते होते. मात्र, निम्बाहेडा पोलिसांनी 30 मार्च 2022 रोजी स्फोटके घेऊन निघालेली एक कार पकडून त्यांचा डाव उधळून लावला होता. त्यांच्या इतर साथीदारांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. या दोघांचा त्या गुन्ह्यात सहभाग होता. तेव्हापासून ते फरार झाले होते.

कोथरुड पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई प्रदीप चव्हाण, अमोल नझण गस्त घालत होते. त्यावेळी तिघे जण दुचाकी चोरण्याच्या तयारीत होते. पोलिसांना संशय आल्याने आरोपी मोहम्मद खान, युनूस साकी यांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता, ते कोढव्यातील मिठानगर परिसरात वास्तव्यास असल्याचे सांगितले. वास्तव्याचा ठिकाणा पाहण्यासाठी पोलिस त्यांना मिठानगर येथे घेऊन गेले असताना, तिघांनीही तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत अटक केलेल्या दोघांना पकडले. एक साथीदार पसार झाला. त्यानंतर खान आणि साकी राहत असलेल्या घराची झडती घेण्यात आली. घरातून एक काडतूस, चार मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले. चौकशीत खान, साकी आणि साथीदाराविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने राजस्थानात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पसार झाले होते. एनआयएने त्यांची माहिती देणार्‍यास पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

दरम्यान, इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या पुणे मोड्युल प्रकरणातील संशयित दहशतवादी रिजवान अब्दुल हाजी अली याला दिल्ली पोलिसांनी 2023 च्या एका गुन्ह्यात बेड्या ठोकल्या. त्याच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तीन लाखांचे बक्षीस घोषित केले होते. एनआयएने पुण्यातील कोंढवा परिसरातील चार मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यामध्ये इम्प्रूव्हाईजड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयडी) बनविण्याचे प्रशिक्षण व दहशतवादी कारवाई संदर्भातले नियोजन येथेच झाल्याने ह्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. सध्या हे प्रकरण मुंबई एनआयएच्या विशेष न्यायालयात दाखल आहे.

याप्रकरणी मोहम्मद शहानवाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख आणि तलाह लियाकत खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ मटका ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (रा. रतलाम मध्य प्रदेश), मोहम्मद युनूस मोहम्मद याकुब साकी ऊर्फ अदिल ऊर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगीर पठाण ऊर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा, पुणे), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला ऊर्फ लालाभाई ऊर्फ लाला ऊर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (रा. तिघेही रा. पडघा, ठाणे) यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सर्वांवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा (युएपीए), एक्सप्लोसिव्ह सबस्टन्स अ‍ॅक्ट, आर्म अ‍ॅक्ट तसेच विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आलमला जेव्हा ताब्यात घेण्यात आले तेव्हा त्याच्या सापडलेल्या कपड्यावरील व त्याचे डीएनए सॅम्पल जुळले. पकडण्यात आलेले सर्व दहशतवादी इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. हे दहशतवादी विदेशात बसलेल्या हँडलरच्या सिक्रेट अ‍ॅपद्वारे संपर्कात असल्याचेही तपासात समोर आले. त्यांनी दरोडे, चोर्‍या करून दहशतवादी कृत्यासाठी निधी उभा केल्याचे व हँडलर कडून देखील पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. या दहशतवाद्यांनी आयईडी (इम्प्रूव्हाईस एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) म्हणजेच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण कोंढव्यात घेतले होते.

त्याआधारे त्यांनी जंगलात रेकी करून नियंत्रित स्फोटाच्या चाचण्या देखील घडवून आणल्या होत्या. त्यांचा महाराष्ट्रातील तसेच गुजरात मधील मेट्रोसिटीमध्ये स्फोट घडवून आणण्याचा देखील डाव होता. त्यांनी दहशतवादी कारवाईसाठी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षणदेखील घेतल्याचे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांनी त्यांचा परदेशातील इसिसचा दहशतवादी हँडलर खलिफा याच्याकडून इसिसशी संबंधित शपथ घेतली असल्याचे निष्पन्न झाले होते.

आता या प्रकरणातील आणखी एक दहशतवादी तपास यंत्रणेच्या गळाला लागल्याने त्याच्याकडून आणखी महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सध्या हा संशयित दहशतवादी रिजवान दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच एनआयए त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

रिजवान इसिस अन् पुणे मोड्यूल!

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, रिजवान हा 2017 मध्ये दहशतवादी शहानवाज याला झारखंडमध्ये भेटला होता. तो दिल्ली येथे शिक्षणासाठी आला असताना तेथे त्याची शहानवाझ याच्याबरोबर घट्ट मैत्री झाली. रिजवानला हजरतला जायचे असल्याने त्याने त्यासाठी फंड गोळा करणे सुरू केले. शहानवाजदेखील त्याला सामील झाला. 2018 मध्ये रिजवान इसिसच्या हँडलरच्या संपर्कात आला. नंतर तो इसिसच्या विचारधारेत गुंतत गेला. त्यानंतर त्यांनी दहशतवादी कृत्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली. शहानवाज नंतर इम्रान आणि युनिस साकी यांच्या संपर्कात आला. त्यानंतर त्यांनी आयडी बनविण्यासाठी साहित्यांची जुळवाजुळव करणे सुरू केले. इम्रान आणि युनिस साकी यांना पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर शहाजवाज आणि रिजवान फरार झाले. त्यातील पुण्यातून फरार झालेला शहानवाज अटक झाला. परंतु, रिजवान तपास यंत्रणांना वारंवार लोकेशन बदलून गुंगाराच देत राहिला. मात्र, दिल्ली स्पेशल सेल आणि एनआयए सातत्याने त्याच्या मागावर होती, अखेर दिल्ली पोलिसांनी रिजवानला बेड्या ठोकल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT