Crime News | शिकार करायला गेला अन् स्वतःच अडकला File Photo
क्राईम डायरी

Crime News | शिकार करायला गेला अन् स्वतःच अडकला

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण आजगेकर, गडहिंग्लज

माणूस प्रेमात आंधळा होतो, असं म्हणतात; पण कधीकधी प्रेमाचा शेवट इतका भयानक होईल याची कोणी कल्पनाही केली नसेल. गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील सुनीता केसरकर या चाळीस वर्षीय महिलेचा अंत असाच काहीसा थरारक आणि काळजाचा थरकाप उडवणारा ठरला. यामध्ये तिची शिकार करणारा शिकारी लीलया यातून सुटेल, असे त्याला वाटत होते. मात्र, पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे तो अलगद जाळ्यात अडकला...

18 जानेवारीचा तो रविवार. सुनीता नेहमीप्रमाणे आठवडी बाजारासाठी घराबाहेर पडली; पण ती पुन्हा कधीच परतली नाही. 21 दिवस उलटले आणि 11 फेब्रुवारीला महागावच्या जंगलातील घंटी झरा नावाच्या ओढ्यात एक छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला. शरीराचा चेहरा आणि डावा हात गायब होता. जंगली श्वापदांनी शरीराचे लचके तोडले होते. नातेवाईकांनी अंगावरील कपडे आणि बांगड्यांवरून ओळख पटवली आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे मानून अंत्यविधीही उरकले; पण पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती.

पोलिसांनी विचार केला की, जर वन्यप्राण्यांनी हल्ला केला असेल, तर महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाईल कुठे गेले? हाच धागा पकडून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना पथकासह या ठिकाणी तपासाकामी पाठविले. गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे, गडहिंग्लजचे सपोनि सागर पाटील, उपनिरीक्षक हणमंत नाईक यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केल्यावर मोबाईल लोकेशन तपासले असता, घटनेच्या दिवशी त्या निर्जन जंगलात पाच मोबाईल क्रमांक सक्रिय असल्याचे आढळले. त्यापैकी एक क्रमांक होता प्रवीण चिंचेवाडीचा, जो मृतदेह सापडल्यापासून गायब होता; मग पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा त्याच्या दिशेनेच फिरवली.

पोलिसांनी सापळा रचून प्रवीणला बेड्या ठोकल्या आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. प्रवीण आणि सुनीता यांचे गेल्या सहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र, प्रवीणच्या नुकत्याच झालेल्या लग्नानंतर सुनीता ‘तू मला सारखा भेटत का नाहीस व खर्चाला पैसे का देत नाहीस’ यावरून वाद घालून दोघांमधील नाजूक संबंधांची वाच्यता करण्याची भीती घालू लागली होती. तिनं तशी वाच्यता केल्यास आपला संसार उद्ध्वस्त होईल, या भीतीने प्रवीणने तिचाच काटा काढण्याचे ठरवले.

18 जानेवारीला त्याने तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने महागावच्या जंगलात नेले. तिथे तिचा गळा दाबून खून केला. त्याने जाणूनबुजून मृतदेह अशा ठिकाणी टाकला जिथे हिंस्र प्राणी येतात. त्याला वाटले की, वन्यप्राणी मृतदेह खातील आणि हा खून नसून वन्यप्राण्यांचा हल्ला वाटेल. इथे मात्र प्रवीणच्या डोक्यातील सोन्याची हावच त्याला तुरुंगाची हवा खायला घेऊन गेली. त्याने सुनीताच्या अंगावरील दागिने काढून घेतले व तिचा मोबाईल घटनास्थळापासून दूर हिरण्यकेशी नदीलगतच्या झुडपामध्ये लपवला. त्याने तिचे दागिने एका सोनाराला विकले. त्या ठिकाणीही त्याची ओळख पटली अन् तो पोलिसांच्या तावडीत अलगदच सापडला. सत्य लपत नाही हेच पोलिसांच्या तपासावरून दिसून आले. सुनीताची शिकार करण्याच्या हेतूने प्रवीणने सगळा सापळा रचला. मात्र, या सापळ्यामध्ये तोच अडकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT