धुळे : धुळे जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या पुजा बागुल खून प्रकरणातील मुख्य आरोपीची साथीदार प्रज्ञा महेश कर्डीले हिचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपीने न्यायालयात निर्दोष असल्याचा युक्तिवाद केला होता, मात्र तो न्यायालयास मान्य झाला नाही.
पुजा बागुल या भारतीय सैन्य दलातील सैनिकाची पत्नी होत्या. त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रज्ञा कर्डीले हिचा हस्तक्षेप झाल्याने व ती पतीशी अनैतिक संबंध ठेवत असल्याने पुजाचा निर्दयपणे खून करण्यात आला. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात पतीसह दहा जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
या प्रकरणात मयत पुजाच्या सासू-सासऱ्यांचा जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळण्यात आला आहे. आता आरोपी प्रज्ञा कर्डीले हिने देखील नियमित जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तिने आपल्या अर्जात, "खुनाशी माझा काही संबंध नाही, माझा कौटुंबिक वाद सुरू आहे आणि माझी लहान मुले आहेत," अशी भूमिका मांडत जामीन मागितला होता.
सरकार पक्षातर्फे ॲड. एन. बी. कलाल यांनी या अर्जाला विरोध करत सांगितले की, आरोपीवर गंभीर आरोप आहेत आणि तिला जामीन दिल्यास ती पुरावे नष्ट करू शकते. मुळ फिर्यादीच्या वतीने देखील जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यामध्ये सांगण्यात आले की, आरोपीने मयत पुजाच्या पतीला सतत चिथावणी देत ती त्याच्यापासून वेगळी व्हावी यासाठी दबाव टाकला. खून करताना पुजाला इंजेक्शन देण्यात आले, ती तडफडत असताना आरोपी प्रज्ञा निर्दयतेने तिचे हाल पाहत होती. या सर्व युक्तिवाद व पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी प्रज्ञा कार्डीले हिचा जामीन अर्ज फेटाळला.