पनवेल (मुंबई) : अटक टाळण्यासाठी एका सराईत आरोपीने पुतणीला ओलीस ठेवत पोलिसांवर सशस्त्र हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री पनवेल शहरात घडली. पोलिसांनी कौशल्यपूर्ण कारवाई करीत अखेर सोबन बाबुलाल महातो (३५, रा. पनवेल) या आरोपीला अटक केली आहे. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
आरोपी सोबन याने बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हातात कुन्हाड व कोयता घेऊन पनवेल शहरातील मंगला निवास या आपल्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील रुमचे लॉक तोडून जबरदस्तीने आत प्रवेश केला. संपूर्ण बिल्डिंग माझी आहे. मला कोणी अडवले तर सर्वांना ठार मारीन, असे ओरडून त्याने रहिवाशांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच आरोपीने कुन्हाड व कोयत्याने हल्ला केला. यात पोलीस नाईक सम्राट डाकी आणि पोलीस नाईक रवींद्र पारधी गंभीर जखमी झाले.
आरोपीने कुटुंबीयांनाही ओलीस ठेवले. आई-वडील, भाऊ व भावाची तीन मुले यांना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला. १६ वर्षीय पुतणी निकिता हिला पकडून तिच्या गळ्यावर कोयता ठेवत ठार मारण्याची धमकी दिली. परिस्थिती गंभीर होत असतानाच पोलिसांनी शिताफीने आत प्रवेश करून आरोपीला शस्त्रांसह पकडले आणि ओलीस असलेल्या मुलीची सुटका केली.