ठळक मुद्दे
मिरा-भाईंदर शहरात बनावट बांधकामाची परवानगी
सदनिकेची विक्री करुन शेकडो सदनिकाधारकांची फसवणुक करणारा बिल्डर ओस्तवाल
विधिमंडळात लक्षवेधीद्वारे आवाज उचलूनही अटक करण्यात आलेली नव्हती
मिरा रोड (ठाणे) : मिरा-भाईंदर शहरात बनावट बांधकाम परवानगीव्दारे शेकडो सदनिकेची विक्री करुन सदनिकाधारकांची फसवणुक करणारा बिल्डर ओस्तवाल बिल्डर्स प्रा. ली. चे संचालक उमराव सिंह ओस्तवाल याला आर्थिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. मिरा रोडमध्ये बनावट बांधकाम परवानगी व बांधकाम नकाशे तयार करून त्याद्वारे चार मजल्याची परवानगी असतानाही सात मजल्याच्या वाढीव मजल्याच्या इमारती बांधल्या. त्यामध्ये शेकडो सामान्य नागरिकांना घरे विक्री करून फसवणूक केली.
मिरा-भाईंदर शहरात सर्वाधिक बोगस व बनावट कागदपत्रे बनवून लोकांची फसवणूक करण्यात विकासक ओस्तवाल बिल्डर यांचे उमरावसिंह ओस्तवाल व त्यांचा मुलगा कुलदीप ओस्तवाल व इतर वास्तुविशारद आहेत. आतापर्यंत त्यांच्यावर एकंदरीत १३ गुन्हे दाखल आहेत. त्यात बनावटीकरण व फसवणुकीचे जवळपास सातहुन अधिक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी अनेक वेळा विधिमंडळात लक्षवेधीद्वारे आवाज उचलला गेला आहे. तरी देखील अटक करण्यात आली नव्हती. त्यांनी आतापर्यंत शेकडो लोकांना फसवेगिरी करत सदनिका व दुकाने विकलेली आहेत. भाईंदरमध्ये तर महापालिकेचा रस्ता व खेळाचे मैदान अतिक्रमण करून त्यावर इमारती बांधल्या आहेत व त्यांची विक्रीसुद्धा केलेली आहे. यानंतरही इमारतींच्या पदाधिकारी यांच्याकडून ना-हरकत दाखला न घेता त्यांच्या हक्काच्या वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक वापरून त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करत होता.
आरोपी विकासक ओस्तवाल बिल्डर्स ली. यांनी बनावट सुधारीत बांधकाम परवानगी व नकाशा तयार करुन ते खरे असल्याचे भासवून त्याआधारे मंजुरीपेक्षा जास्त माळ्याचे वाढीव बेकायदेशीर बांधकाम केले. तसेच बांधकाम केलेल्या सदनिकेची विक्री करुन मेसर्स ओस्तवाल पैराडाईज बिल्डींग क्र. ६ मधील सदनिका धारकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्यामुळे सदनिकाधारकांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे नयानगर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन चौधरी आर्थीक गुन्हे शाखा हे करीत आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्ह्यातील आरोपी बांधकाम व्यावसायीक
ओस्तवाल बिल्डरचे संचालक आरोपी उमरावसिंह पृथ्वीराज ओस्तवाल यांचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यासाठी तपासी अधिकारी पथकासह त्यांच्या निवासस्थानी गेले असता आरोपीला चाहुल लागल्याने तो पळुन गेला. त्यानंतर गुन्हे प्रकटीरण कक्ष १ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशिलकुमार शिंदे यांनी तपास करत आरोपी पळून जात असतांना त्याला पोलीस पथकाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले. तपासी अधिकारी यांनी आरोपीला रितसर अटक करुन न्यायालयाचे समक्ष रिमांडकामी हजर केले आहे. आरोपीच्या विरोधात नवघर, मिरारोड, नयानगर व काशीमिरा पोलीस ठाण्यात एकुण १३ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.