विठ्ठल हेंद्रे, सातारा
सातार्यात गांजासह ड्रग्जचा अतिवापर होत असल्याने शहरातील गुन्हेगारांना ‘डेअरिंग बूस्ट’ मिळत आहे. ‘फूक गांजा... घे कोयता अन् घाल डोक्यात!’ बीड जिल्ह्याप्रमाणे एखाद्याला ‘गोल रिंगण करून मारणे’ असे पॅटर्न बनवले जात असून, क्राईम करण्यासाठी बालगुन्हेगारीचा अक्षरश: बिनधोकपणे वापर केला जात आहे. याला गांजाने बनलेल्या ‘बंटा’ गोळ्यांचीही जोड मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकाच महिन्यात सावरी (ता. जावली) व कराड तालुक्यातील पाचुपतेवाडीत एमडीसारखे ड्रग्ज बनवणारे कारखानेच सापडले आहेत. यामुळे सातारा पोलिस दल नेमके काय करतंय? असा खडा सवाल उपस्थित झाला आहे.
पेन्शनरांचं गाव ते गुन्हेगारीचं केंद्र?
एकेकाळी निवृत्त सैनिक, शासकीय कर्मचारी, शांतताप्रिय नागरिकांसाठी सातारा सुरक्षित शहर मानलं जायचं. मात्र, आज ही ओळख झपाट्याने पुसली जात आहे. रात्री बाहेर पडायची भीती वाटते, मुलांना एकट्याने सोडताना धडधड वाढते, अशा भावना सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. कारण, गांजा मारणारी गंजाडी, बुलेटसह इतर फटाका फोडत जाणारी वाहने, दिवसाढवळ्या कोयत्याने होणारी तोडातोडी अशा प्रकारच्या भानगडी कमालीच्या वाढत चालल्या आहेत.
सातार्याला गुन्हेगारी विळखा
गुन्हेगारीच्या विळख्यात सातारा अक्षरश: गुरफटला जात आहे. नशेच्या ‘बंटा’ गोळ्या तर पानटपरीसारख्या ठिकाणीही सहज मिळत आहेत. अनेक ठिकाणी ड्रग्जचे वितरण होत असून, नशेडी लोक रस्त्यालगत, अडगळीच्या ठिकाणी दम मारत झिंगत आहेत. ड्रग्जची इंजेक्शनदेखील सातार्यात मिळत असल्याचा नुकताच पर्दाफाश झाला आहे. या सर्व गुन्हेगारीत लहान मुले टार्गेट होत असून, गुन्हेगारीचे स्तोम माजत आहे.
कोयता गँगची वाढती दहशत
भरीत भर म्हणून सातार्यात गँगवॉरदेखील उफाळले आहे. काही दिवसांपूर्वी भरदिवसा सातजणांच्या टोळक्याने एकावर धारदार कोयत्याने सपासप वार केले. जखमी केल्यानंतर हल्लेखोरांनी त्या जखमीला दुचाकीवरून नेऊन आपल्या एरियात नेत पुन्हा क्रूरपणे मारले आहे. शहरात कोयता गँगचा मोकाट वावर वाढत चालला आहे. किरकोळ वादातून थेट प्राणघातक हल्ले होत असून, तरुणांच्या हातात शस्त्रं आता सहज दिसू लागली आहेत. कायद्याचा कसलाही धाक उरलेला नाही, अशी भावना नागरिकांमध्ये रुजत चालली आहे. अनेक प्रकरणांत गुन्हेगार खुलेआम फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
पोलिस समाज माध्यमांवर ‘वॉच’ ठेवणार का?
सातारा पोलिसांनी भागातील सोशल मीडिया तपासला तर बहुतांशी गुन्हेगारांची माहिती व त्यांचे उद्योग समजतील. यासाठी पोलिसांनी स्वत:हून काही बाबी करायला पाहिजेत. गुन्हेगार लवकर फेमस होण्यासाठी इन्स्टाग्रामसह इतर समाज माध्यमे वापरत आहेत. ती गुन्हेगारांचा ‘अड्डा’ बनली आहेत. भाई, दादा, डॉन, सरकार, किंग अशी बिरुदावली लावून हातात शस्त्रे घेऊन रील्सचा अक्षरश: पाऊस पाडला जात आहे. यामुळे सातारा पोलिसांनी सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवल्यास भविष्यात डोकेदुखी ठरणार्या गुन्हेगारांवर आवर घातला जाऊ शकतो.
चमकोगिरीवर करिअरचा उतारा
एस.टी. स्टँड, कॉलेज परिसरात हाणामारी झाल्या की, लगतच्या चौकीत किंवा पोलिस ठाण्यापर्यंत हे प्रकरण जाते. पोलिसांकडे असा मॅटर गेला की, पोलिस दोन्ही पार्टींची ‘परिस्थिती’ बघतात. चमकोगिरी करणार्या पोरांना पोलिस फैलावर घेतात. मात्र, ‘करिअर खराब होईल,’ अशी भीती दाखवतात. यामुळे तक्रारी दाखल होत नाहीत. याशिवाय गंभीर प्रकरण ‘मिटवले’ म्हणून खाकी हात ओले करून प्रकरण मिटवले जाते. बालगुन्हेगारी बोकाळण्याची ही अशी मूळ कारणं आहेत. याच ठिकाणी पोलिसांनी खाक्या दाखवत फटके देऊन कुटुंबीयांना शिकणार्या पोरांचे नेमके उद्योग सांगणे गरजेचे बनले आहे. नाही तर शहराचा गुन्हेगारीतला आणखी एक बीड जिल्हा व्हायला जास्त वेळ लागणार नाही.
1,068 किलो गांजा जप्त
सातारा जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांत गांजा शेतीचे पीक जोमात सुरू असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या आकडेवारीत 3 वर्षांत गांजाचे 44 गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये 1,068 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजाव्यतिरिक्त इतर नशेली ड्रग्ज, नशेची इंजेक्शनची संख्या वेगळीच आहे. पोलिसांकडून किरकोळ कारवाई झाली की, या कारवाईनंतर गांजा, ड्रग्ज कुठून आणला, हे पोलिस कारवाईत गुलदस्त्यात राहत आहे. यामुळे ड्रग्ज, गांजा माफिया पुन्हा आपले हातपाय पसरत आहेत.