Pune Crime News | एन्काऊंटर..! Pudhari File Photo
क्राईम डायरी

Pune Crime News | एन्काऊंटर..!

पुढारी वृत्तसेवा

अशोक मोराळे, पुणे

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला गुंड शाहरूखची माहिती मिळाली होती. दुपारी चार वाजता पोलिसांचे एक पथक त्याला पकडण्यासाठी रवाना झाले. तांत्रिक विश्लेषणात शाहरूख सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावाच्या परिसरात लपला असल्याचे समजले. त्यावेळी रविवारी पहाटेचे साडेतीन वाजले होते. घराच्या दुसर्‍या मजल्यावर शाहरूख झोपला होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि नातेवाईकांची लहान मुले त्याच खोलीत होती...

पुण्यातील कुख्यात गुंड आणि टिपू पठाण टोळीचा सक्रिय सदस्य शाहरूख ऊर्फ अट्टी रहीम शेख (वय 23, रा. सय्यदनगर, हडपसर) याचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकताच एन्काऊंटर केला. सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावात रविवारी (दि.15) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला होता. पोलिसांची चाहूल लागताच शाहरूखने पत्नी आणि घरातील लहान मुलांची ढाल करत गावठी कट्ट्यातून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, स्वसंरक्षणार्थ पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर पंधरा गुन्हे दाखल असल्याचे पोलिस सांगतात. हडपसरमधील एका जागेवर ताबा मारून टिपू आणि त्याच्या साथीदारांनी ती जागा परत देण्यासाठी 20 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी शाहरूखसह 17 जणांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो फरार होता.

शाहरूख फरार झाल्यापासून गुन्हे शाखेची पथकं त्याच्या मागावर होते. एकेदिवशी त्याने एका मोबाईल क्रमांकावरून फोन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ती व्यक्ती शिरापूर गावची राहणारी होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला शाहरूखचा फोटो दाखवला, त्या वेळी त्याने सांगितले की, आठ ते दहा दिवसांपूर्वी फोटोतील व्यक्ती पुणे-सोलापूर हायवेवरील लांबोटीतील एका गॅरेजवर भेटली होती. त्याने दुचाकी दुरुस्तीसाठी टाकली होती. त्याला पैशाची गरज होती. नातेवाईकाला फोन करण्यासाठी त्याने माझा मोबाईल घेतला होता. त्यानंतर पोलिसांना लांबोटीमधील एका मोबाईल शॉपीवाल्याचा धागा सापडला. त्याला पोलिसांनी गाठले. त्याच्याकडे चौकशी केली असता, तो म्हणाला, 13 मे ते 13 जून या कालावधीत त्याने नऊ वेळा कोणासोबत तरी संपर्क करून पैसे मागविले आहेत. तो एका काळ्या मोपेड दुचाकीवरून लांबोटी गावच्या दिशेने जात होता.

आता पोलिसांनी शाहरूखची काळी दुचाकी शोधून काढली. एका इमारतीच्या बाजूला ही दुचाकी लावण्यात आली होती. त्याला आश्रय दिलेल्या त्याच्या नातेवाईकांना उठवून तो वरच्या मजल्यावर राहत असल्याची पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर त्याच घरातील एका महिलेला घेऊन पोलिस वरच्या मजल्यावर गेले. वर जाताच त्यांनी घराचा दरवाजा वाजवला; मात्र आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळाने आतून त्याच्या बायकोने कोण आहे, असे विचारले. त्यानंतर पोलिसांसोबत असलेल्या त्या महिलेने आपली ओळख सांगून ‘मी आहे, दरवाजा उघड’ असे सांगितले. त्यानंतर शाहरूखच्या पत्नीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच पोलिस आत घुसले. तिने आरडा-ओरडा करत पोलिसांना धक्काबुक्की केल्याचे पोलिस सांगतात.

पोलिस आल्याचे पाहताच शाहरूखने गावठी पिस्तूल पोलिसांवर ताणले. पोलिसांंनी आपली ओळख करून दिल्यानंतर त्याला शरण येण्याचे आवाहन केले. त्यावेळी गुन्हे शाखा युनिट सहाचे सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे पथकाचे नेतृत्व करत होते. तर युनिट पाचचे पोलिस कर्मचारी सोबत होते. एकाच खोलीत पोलिस आणि गुंड शाहरूख आता आमने-सामने आले होते.

तेवढ्यात त्याला युनिट पाचचे तीन पोलिस कर्मचारी दिसले. त्यांना शाहरूख ओळखत होता. त्या तिघांना पाहून तो जोरजोरात ओरडू लागला. ‘तुम मुझे पकडते क्या, आज तुम्हारा खेल खतम करता हूँ, मैं तुमको जिंदा नहीं छोडूंगा’ असे म्हणत त्यांच्या दिशेने गोळी झाडली. या वेळी खोलीत शाहरूखची पत्नी, दोन लहान मुले होती. कांबळे त्याला ‘गोळी झाडू नको. पिस्टल खाली ठेव,’ असे सांगत होते. त्यानंतर देखील त्याने दुसरी गोळी झाडली. त्यानंतर मात्र कांबळे यांनी प्रसंगावधान राखत त्याच्यावर कमरेच्या खाली गोळी झाडली. त्यानंतरसुद्धा शाहरूख अत्यंत आवेशाने पोलिसांवर गोळी झाडत होता. यानंतर कांबळे यांनी परत त्याच्यावर गोळी झाडली. शाहरूख आणि पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत त्याने पोलिसांवर चार गोळ्या झाडल्या, तर पोलिसांकडून पाच राऊंड फायर करण्यात आले. गोळीबारात जखमी होऊन खाली पडल्यानंतर शाहरूखला पोलिसांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. तेथे त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शाहरूख राहात असलेल्या घरातून पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसे, दोन लोखंडी कोयते असा शस्त्रसाठा जप्त केला होता. काही वेळातच गुंड शाहरूख, पुणे पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची बातमी परिसरात वार्‍यासारखी पसरली. बघ्यांची मोठी गर्दी लांबोटी गावात झाली होती. त्याच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या सोबतच्या गुन्ह्यात फरार असलेले दोघे साथीदार पोलिसांना शरण आले.

पुण्यातील 33 गुंड चकमकीत ठार!

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील पोलिसांची पहिली चकमक लष्कर भागातील धोबीघाट परिसरात 1983 मध्ये घडली. त्यावेळी सुरेंद्र पाटील, विनायकराव जाधव यांनी राजू हिसामुद्दीन शेख याला चकमकीत ठार मारले. त्यानंतर दत्तवाडीतील गुंड जग्या म्हस्के याला चकमकीत तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय टेमघरे यांनी ठार मारले होते. अरुण गवळी टोळीतील गुंड किरण वालावलकर आणि रवी करंजावकर यांना पोलिस उपनिरीक्षक सुरेश पोटे, टेमघरे यांनी ठार मारले. 23 सप्टेंबर 92 रोजी येरवड्यातील गुंड मेघनाथ शेट्टी याला पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र जोशी, अजित जोशी यांनी चकमकीत ठार मारले. प्रमोद माळवदकर याचा पिंपरीतील काळेवाडीत पोलिस उपनिरीक्षक राम जाधव, बापू कुतवळ यांनी चकमकीत ठार मारले. त्यानंतर रोहिदास येवले, रॉबर्ट साळवे, राहुल कंधारे, मोबीन शेख, रमेश तिवारी, तळेगाव दाभाडेतील श्याम दाभाडे, धनजंय शिंदे, देहूरोड भागातील गुंड राकेश ढोकलिया ऊर्फ महाकाली यांंना चकमकीत ठार मारण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT