एखाद्या पेशाने कोणती पातळी गाठावी, याच्या ढोबळ मर्यादा आहेत. त्या ओलांडल्या की, पेशाविषयी समाजमनात असलेला आदर संपुष्टात येतो. शिक्षण क्षेत्रात तर भवितव्य घडविण्यासाठी मुले-मुली प्रयत्नांची किती पराकाष्ठा करतात, हे आपण अनुभवत आलो आहोत. याचाच गैरफायदा घेत काही महाभागांनी शिक्षण हा धंदा करून टाकला. धंद्यात सर्वकाही क्षम्य असते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी कितीही खर्च करण्याची तयारी असलेल्या पालकांचा शोध त्यांनी सुरू केला. त्यातूनच मोठी बाजारपेठ उभी राहिली आणि बाजाराचे नियमही लागू झाले...
महाराष्ट्रात शिक्षणाचा लातूर पॅटर्न गेल्या 40 वर्षांपासून नावाजलेला आहे. दयानंद आणि शाहू महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन उच्चपदे भूषवत असलेल्या कोणालाही या पॅटर्नविषयी विचारले, तर मुलांवर मेहनत घेणारे शिक्षक, एवढाच हा पॅटर्न असल्याचे लक्षात येईल. समोर बसणारा प्रत्येक मुलगा-मुलगी आपली आहे, तिला घडवण्याची, आयुष्यात उभे करण्याची जबाबदारी आपली आहे, ही जाणीव असलेले शिक्षक या संस्थांना लाभले आणि त्यांची ख्याती देशभर पसरली. आपले पाल्य लातूरला शिकले, तर त्याचे भविष्य उज्ज्वल होईल, हा विश्वास पालकांच्या मनात निर्माण झाला. शिक्षकांनीही ती जबाबदारी दशकानुदशके निभावली. त्यामुळे अवघ्या लातूर शहरातच शिक्षण-संस्कृती रुजली आहे. हजारो विद्यार्थी फक्त आणि फक्त अभ्यासच करतात. त्यांच्या शैक्षणिक समस्या शिक्षक हिरिरीने सोडवतात. महाविद्यालये आणि कोचिंग क्लासमध्येही ही संस्कृती कायम आहे.
देशभरातील ख्यातनाम शिक्षक लातूरला येऊन अध्यापन करू इच्छितात, त्यामागे हेच कारण आहे. मात्र, या वैभवाला गालबोट लावणारी घटना उघडकीस आल्यामुळे ‘मास्तर, तुम्हीसुद्धा?’ असा प्रश्न लोक विचारत आहेत.
रात्रीचा दिवस करून नीट परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न बाळगणार्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा पद्धतीबद्दल संशय निर्माण करणारा देशपातळीवरील नीट घोटाळा चव्हाट्यावर आला. त्यापाठोपाठ लातूरच्याही जलीलखां उमरखां पठाण आणि संजय तुकाराम जाधव या दोन शिक्षकांची चौकशी सुरू झाली. त्यांना अटकही करण्यात आली. विद्यार्थ्यांना पाच लाखांत नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून देऊ, असे आमिष दाखवत या सरकारी सेवेतील शिक्षकांनी पैसा गोळा केला. इरण्णा कोनगलवार या आयटीआयमधील शिक्षकामार्फत दिल्लीलाही त्यातील काही पैसे पाठविले. दिल्लीतील गंगाधरपर्यंत हे धागेदोरे जुळविण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, गंगाधरमार्फत नीट परीक्षेच्या यंत्रणेपर्यंत पैसा पोहोचविला गेला की, प्रश्नपत्रिका फोडणार्यांपर्यंत गेला, याचा तपास अद्याप लागलेला नाही. लातूरच्या या दोनपैकी जलीलखां हा कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक आहे, तर संजय जाधव हादेखील जि.प. शाळेचा शिक्षक आहे.
नीट परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे गोळा करून हे दोन शिक्षक इतरांच्या मार्फत दिल्लीच्या मध्यस्थाकडे पाठवत होते, अशी माहिती तपासात पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्या परीक्षेबाबत देशभरात कमालीची विश्वासार्हता होती, त्यातही घोटाळा होऊ शकतो, असे अविश्वासाचे वातावरण या प्रकारामुळे निर्माण झाले आहे. देशपातळीवरील राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून (एनटीए) नीट परीक्षेचे नियोजन केले जाते. या संस्थेच्या प्रमुखांनाही बदलण्यात आले आहे. पाटण्यात आणि गुजरात, राजस्थानातील काही ठिकाणी असेच धागेदोरे सापडले आहेत.
नीटचा पेपर फुटला आणि त्याची लाखो रुपयांत सौदेबाजी झाली, हेदेखील उघडकीस आले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे सीबीआय खोदून काढेल आणि यथावकाश दोषींना शिक्षाही होईल. विद्यार्थ्यांचे भवितव्य दावणीला लावणार्या अशा घटना घडू नयेत, यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा केला आहे. त्यानुसार आरोप सिद्ध झाल्यास यातील दोषींना एक कोटी रुपये दंड आणि दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकेल. मात्र, नीट यंत्रणेला लागलेला हा डाग पुसून काढण्यासाठी कित्येक वर्षे लागतील.
या चाचणीत ज्यांना ग्रेस गुण देण्यात आले, त्यापैकी 52 टक्के विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा दिली आहे. ते कदाचित निर्दोष असावेत. 5 मे रोजी घेण्यात आलेल्या नीट चाचणीत ज्यांनी गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले, अशा 80 विद्यार्थ्यांना ‘एनटीए’ने ‘डिबार’ केले आहे. डॉक्टर होण्यासाठीही गैरप्रकारांचा अवलंब केला जाऊ शकतो, हे सिद्ध झाल्यामुळे पुढील चार वर्षांनंतर एमबीबीएसची पदवी हातात घेऊन आलेला प्रत्येक डॉक्टर गुणवंत असेल काय, याविषयी शंका निर्माण झाली आहे.