नाशिक : शहरातून जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०२४ या आठ वर्षांच्या कालावधीत चोरट्यांनी ४ हजार ९६३ वाहने चोरली आहेत. त्यामुळे शहरातून दरवर्षी सरासरी ६२० वाहने लंपास होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
चोरीस गेलेल्या वाहनांपैकी अवघी २५ टक्के वाहनेच पोलिसांना शोधता आली असून उर्वरित वाहनांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना आर्थिक फटका बसला आहे.
गुन्हेगारांमध्ये 'इझी मनी' म्हणून वाहन चोरीचा प्रकारही प्रचलित आहे. कारण वाहन चाेरी केल्यानंतर त्याची ग्रामीण भागात किंवा परजिल्ह्यात मिळेल त्या किमतीत विक्री केली जाते किंवा वाहनांचे स्पेअर पार्ट सुटे करून त्यातून पैसे कमवले जातात. त्यामुळे चोरट्यांना काही तासांत किंवा दिवसांत पैसे मिळत असल्याने चोरटे वाहन चोरीवर भर देतात. त्यानुसार शहरातही वाहन चोरीचे प्रकार नित्याचे आहेत.
नाशिक शहरात सन २०२३ मध्ये ८४२ वाहने लंपास झाली होती. त्या तुलनेत सन २०२४ मध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये ७६ ने घट झाल्याचे काहीसे दिलासादायक चित्र पाहावयास मिळाले. मात्र वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाणही १५ टक्क्यांनी घटल्याचे वास्तव आहे. २०२३ मध्ये पोलिसांनी ३०० वाहनांचा शोध लावला होता, तर २०२४ मध्ये १६२ वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी चोरीस गेलेल्या वाहनांचा शोध लावण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. या पथकामार्फत काही वाहन चोरांची धरपकड करून वाहनांचा शोधही लावण्यात आला. मात्र त्यानंतर पथकाचे कामकाज थंडावल्याचे दिसते. वाहन चोरीचा तपास लागत नसल्याने वाहनधारकांना दुहेरी आर्थिक भुर्दंड बसत आहे. चोरीस गेलेल्या वाहनानंतर त्यांना पुन्हा नव्याने कर्ज काढून वाहन खरेदी करावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहन चोरीचे प्रकार रोखण्याबराेबरच चोरट्यांना पकडण्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातून आठ वर्षांत चार हजार ९६३ वाहनांची चोरी झाली आहे. त्यापैकी एक हजार १९२ वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे, तर तीन हजार ७७१ वाहने अद्याप सापडलेली नाहीत. त्यामुळे चोरलेल्या वाहनांपैकी सुमारे ७५ टक्के वाहने चोरट्यांच्या ताब्यात आहेत किंवा चोरट्यांनी त्यांची विल्हेवाट लावली आहे.