नाशिक : महानगरपालिका निवडणूक, नाताळ तसेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परराज्यातून अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्यांकडून १४ लाखांहून अधिक किमतीचा विदेशी मद्यसाठा, वाहन व इतर साहित्य दलपतपूर येथून जप्त करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक अ. सू. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.२२) शुल्क ड विभाग कार्यालयास गुप्त माहिती मिळाली की, ठाणापाडा–हरसुल रोडलगत दलपतपूर शिवार (ता. त्र्यंबकेश्वर) येथून नाशिकच्या दिशेने परराज्यातील अवैध विदेशी मद्याची वाहतूक होत आहे. त्या अनुषंगाने वाहन तपासणी सुरू केली असता हुंडाई कंपनीची कार (एम.एच. १५, जी.आर. ५३२०) थांबविण्यात आली असता तीच्या तपासणीत राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला दमण, दीव व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस असलेला विविध ब्रँडचा विदेशी मद्यसाठा एकूण ७३ बॉक्स आढळून आले. याशिवाय चार बनावट नंबर प्लेट्सही सापडल्या. या प्रकरणी वाहनचालक मयुरभाई भगुभाई पटेल (३३, रा. ५०७, लिलवन फलिया, सिंदाई, जि. नवसारी, गुजरात) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वाहतुकीसाठी वापरलेले वाहन, संशयिताकडील दोन मोबाईल असा एकूण १४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक एन. एच. गोसावी, दुय्यम निरीक्षक आर. एन. सोनार, एस. आर. इंगळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक हेमंत नेहेरे, जवान एस. ए. माने, उर्वेश देशमुख, लक्ष्मीकांत अहिरे, स्वप्नील सूर्यवंशी तसेच वाहन चालक महेश खामकर यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक एन. एच. गोसावी करीत आहेत.
अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतूक यासंदर्भात कोणतीही माहिती किंवा तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक 18002339999, व्हॉट्स ॲप क्रमांक8422001133 किंवा दूरध्वनी क्रमांक 0253–2581033 वर संपर्क साधावा.संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क