सिडको (नाशिक) : रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात माझ्या रिक्षा समोर बस का उभी केली अशी कुरापत काढत शाळेच्या बसवर दगड मारून बसच्या काचा फोडल्याची घटना चुंचाळे घरकुल भागात घडली. या प्रकरणी चुंचाळे पोलीस चौकीत संबंधित रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि. ११)सकाळी आठ वाजता घरकुल योजना गेट जवळ शाळेची बस खड्ड्यामुळे हळूहळू पुढे नेत असताना समोरून आलेल्या रिक्षाचालक संशयित पंकज सोनवणे, (वय २४ रा. घरकुल इमारत अंबड) याने स्कूल बस चालक यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करत बसला लाथ मारली आणि चालकाला मारण्यासाठी खाली ओढण्याचा प्रयत्न केला. या वेळी चालकाने बस पुढे नेली. यावेळी रिक्षाचालकाने संतापाच्या भरात बसच्या मागील काचांवर दगडफेक केली. यामुळे बसची काच फुटली. त्या वेळी बसमध्ये शाळकरी विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली होती.
याप्रकरणी श्याम जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रिक्षाचालक पंकज सोनवणे याच्या विरोधात चुंचाळे पोलिस चौकी, अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.