वावी (सिन्नर, जि. नाशिक) : सिन्नर - शिर्डी महामार्गावर मिरगाव फाट्याजवळ लॅब टेक्निशियन कर्मचार्याला मारहाण करून 15 हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे.
सुधाकर सोपान वक्ते (35) आणि त्याचा सहकारी सौरभ पवार (25) हे दोघे वावी येथील वृंदावन लॅबमध्ये काम करतात. ते काम आटोपून पल्सर दुचाकीवरून घरी जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांची दुचाकी आडवी लावून लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर सुधाकर यांच्या खिशातील 15 हजार रुपये काढून घेतले तसेच पवारकडून गाडीची चावी हिसकावून शिर्डीच्या दिशेने पसार झाले. जखमी सुधाकर वक्ते यांना मित्रांच्या मदतीने उपचारासाठी नेण्यात आले. जुन्या वादातून ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. वावी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय कोठावळे अधिक तपास करीत आहेत. महामार्गावर अशा प्रकारच्या लुटीच्या घटना वारंवार घडत असून, पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.