हत्या करण्यात आलेले दोन सख्खे भाऊ जाधव बंधू Pudhari News Network
क्राईम डायरी

नाशिक हादरलं! दोन सख्ख्या भावांचा खून

Nashik Murder: रंगपंचमीची धूम सुरु असतांना नाशिक शहरात रंगाचा बेरंग; मृतापैकी एक अजित पवार गटाचा शहर उपाध्यक्ष

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या, मारामारी अशा घटना सातत्याने घडत आहेत. आता पुन्हा एकदा हत्येच्या घटनेमुळे नाशिक हादरलं आहे. नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावांची हत्या झाल्याची घटना घडली आहे.

नाशिकला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच आहे. नाशिक उपनगर परिसरात असलेल्या आंबेडकर वाडी येथे दोन सख्ख्या भावांचा खून झाला आहे. उमेश ऊर्फ मुन्ना जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. उमेश ऊर्फ मुन्ना जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक शहरात गुरुवार (दि.20) रोजी रंगपंचमीची धूम सुरु असतांना बुधवारी (दि.19) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकरवाडी भागात या दोन हत्या झाल्या आहेत.

दोघा भावाची हत्या करून हल्लेखोर फरार झाले आहेत. हत्येच कारण अस्पष्ट असून दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू आहे.

सार्वजनिक शौचालयासमोरच भीषण हल्ला

कोयता घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी सार्वजनिक शौचालयासमोरच जाधव या दोघा भावांवर भीषण हल्ला केला. अनेक वार अंगावर झाल्याने दोघे भाऊ जागेवरच रक्ताच्या थारोळ्या कोसळले. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी दोघा भावांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपसाल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.

राजकीय वैमनस्यातून हत्या ?

आंबेडकरवाडी परिसरात बुधवारी (दि.19) रोजी रात्रीच्या सुमारास हा गुन्हा घडला. मृत पावलेल्या दोघांपैकी एक भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहरउपाध्यक्ष आहे. या हत्यांमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या तुकड्या रवाना झाल्या आहेत. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली की, आणखी काही कारण याचा तपास पोलीस करत आहेत. नाशिकमध्ये गुन्हेगारी फोफावत चालली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT