सातपूर (नाशिक) : परिसरात सलग दोन वेगवेगळ्या अपहरणांच्या घटनांप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीनांसह पाच जणांना ताब्यात घेतले.
मंगळवारी (दि. १७) दुपारी 2 च्या सुमारास पपया नर्सरी परिसरात तेजस धाडगे या युवकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणात दोन विधिसंघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी गिरीश शिंगोटे व त्याचे साथीदार फरार आहेत. अपहरणात वापरलेली कार (एमएच ०६, एएस ५५१७) जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाला प्रेमसंबंधाची किनार असल्याचे पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बुधवारी (दि. १८) दुपारी 12.30 च्या सुमारास सातपूर येथील विधाते गल्लीतील रहिवासी पंकज बन्सीलाल तेली यांचे अपहरण करण्यात आले होते. देवळाली गाव परिसरातील संदीप आलोकलाल उर्फ बाबू मणियार (२८), गणेरा राजाराम पगार (३५) व विजय राजेंद्र अवचित्ते (३५, रिक्षाचालक) यांनी मारहाण करून तेली यांना गाडीत टाकून पळवून नेले होते. तत्काळ हालचाल करून उपनगर व सातपूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत तेली यांची सुटका करत तिघांना ताब्यात घेतले. या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. कारवाईत उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयंत झिरसाठ, सातपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सचिन खैरनार, उपनिरीक्षक राकेश न्हाळदे व सागर गुंजाळ यांच्या पथकाने सहभाग घेतला.