नाशिक : नाशिकमध्ये बोकाळलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या 'ऑपरेशन क्लिनअप'चे नाशिककरांकडून कौतुक होत असून, गुन्हेगारांना पळता भुई कमी पडत आहे. मागील दहाच दिवसात पोलिसांनी तब्बल ६५ रिलबाजला पोलिसी हिसका दाखविला आहे. तसेच या सडकछाप रिलमेकर्सचा योग्य समाचार घेवून, त्यांच्याच भाषेत माफीनामा सादर करणाऱ्या रिल्सही पोलिसांनी व्हायरल केल्या आहेत.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अवघ्या २४ तासातच नाशिकच्या गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडले आहेत. अनेक गुन्हेगारांनी नाशिकमधून आपले बस्तान हलवत इतर शहरात पसार झाले आहेत. तर काही सडकछाप भाई अंडरगाऊंड झाले आहेत. 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' याप्रमाणेच सध्या सर्वत्र पोलिसांची चलती दिसून येत असून, नाशिककरांमध्ये सुरक्षिततेची भावना बघावयास मिळत आहे. पोलिसांनी मागील १० दिवसांत अनेकांना पोलिसी खाक्या दाखविल्या आहेत. विशेषत: रिल्स बनवून दहशत पसरविणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. रिल्स बनविणाऱ्यांना पोलिस ठाण्यात आणून, त्यांचा यथोचित समाचार घेवून त्यांच्याच शब्दात माफीनामा सादर करणाऱ्या रिल्स पोलिसांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून व्हायरल केल्या आहेत. तसेच या रिलबाजांना सक्त ताकीद देताना, पोलिसांची तुमच्यावर नेहमीच करडी नजर असेल असा इशाराही दिला आहे.
याशिवाय तब्बल दोन हजार ५७१ टवाळखोरांची धरपकड केली आहे. शहरातील विविध विभागात टवाळखोरांविरुद्ध मोहिम काढत त्यांना पडताभुई कमी केली आहे. बार तसेच हाॅटेल्सवर अचानक धाड टाकत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या भाईंना चांगलाच दणका बसल्याचे दिसून येत आहे.
10 दिवसातील पोलिस कारवाई
स्टॉप ॲण्ड सर्च - ८,४६५
टवाळखोर - २,५७१
रिलमेकर्स - ६५
बॅनवर झळकणारे गुन्हेगार - २३
कायद्याच्या चौकटीत रहा
मागील दहा दिवसात आम्ही अनेकांवर कारवाई केली असून, ती आणखी वाढवण्याच्या तयारीत आहोत. जर तुम्हाला या आकड्यांपैकी एक व्हायचे नसेल तर कायद्याच्या चौकटीत रहा, असा इशारा नाशिक पोलिसांनी टवाळखोरांना पोलिसांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळीचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
नाशिक : रिल्स व चमकोगिरीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या विरोधात कठोरात कठोर कारवाई केली जाईल. याचा त्रास संबंधित गुन्हेगाराला तर होईलच मात्र त्याबरोबर त्याच्या कुटुंबीयांना सुद्धा होईल. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रकारचे कृत्य करू नये, असा निर्वाणीचा इशारा नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून परिसरामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी वापर होत आहे. या विरोधात संपूर्ण जिल्ह्यामध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे. नाशिक शहराबरोबर ग्रामीण पोलिस हद्दीतही असे रिल्स पोस्ट करणारे आढळले आहेत. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना कारागृहात पाठवले आहे. जर कारागृहात जायचं नसेल तर कायद्यात रहावेच लागेल असे स्पष्ट सूचना अधीक्षक पाटील यांनी दिल्या आहेत. लासलगाव येथील गुन्हेगारांनी दहशत निर्माण करणारा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला होता. त्या माध्यमातून पोलिस यंत्रणा ही सतर्क झाली. तत्काळ यामधील संशशितांच्या मुसक्या आवळून त्याला पोलीस ही खाक्या दाखविला. त्यांनी स्वतःचाच व्हिडिओ नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे सांगितले. यापुढेही अशा वृत्तीला कुठल्याही प्रकारे थारा दिला जाणार नाही अन्यथा कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी असे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.