नाशिक : दीड वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पतीने तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप विवाहितेने केल्यानंतर पोलिसांनी चिमुकलीचा पुरलेला मृतदेह काढून त्याचे शवविच्छेदन केले. त्यात चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र विहीरीजवळ चिमुकली कशी गेली असा प्रश्न करीत तिच्या आईसह इतर नातलगांनी मृत्यूवर प्रश्न उपस्थित केले आहे.
विद्या विकास वळवी (रा. सोमेश्वर कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची दीड वर्षाची मुलगी वैष्णवी विकास वळवी हिचा मृत्यू झाल्यानंतर पतीने परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप केला. त्यामुळे न्यायालयाची परवानगी घेत म्हसरुळ पोलिसांनी आणि अपर तहसिलदार अमोल निकम यांच्या समक्ष वैष्णवीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून तो जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. तेथे गुरुवारी (दि.१३) शवविच्छेदन करण्यात आले. त्यात वैष्णवीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, वैष्णवीचे वडिल विकास वळवी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, खेळताना वैष्णवी विहीरीत पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. मात्र वैष्णवीच्या आईने तिच्या मृत्यूबद्दल संशय वर्तवला आहे. विहीरीजवळ वैष्णवी कशी गेली असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस तपास करीत आहेत.