इंदिरानगर (नाशिक) : पैशांच्या वसुलीसाठी वारंवार तगादा लावल्याने तसेच फोनवरून धमकी दिल्याने सततच्या धमकी आणि मानसिक त्रासामुळे तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात जीवनयात्रा संपविण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सायली अभिषेक महाजन (वय ३४, रा. आनंदिता रेसिडेन्सी, रामनगर, इंदिरानगर) यांचे पती अभिषेक यांनी २०२३ मध्ये संशयित आरोपी सागर गायकवाड व आकाश गायकवाड यांच्याकडून व्याजाने २२ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यातील १८ लाख रुपये परत दिले असतानाही संशयित उर्वरित रकमेसाठी सतत घरी येत तसेच फोनवरून धमक्या देत. सततच्या धमक्या आणि मानसिक तणावामुळे अभिषेक महाजन हे अत्यंत नैराश्यग्रस्त झाले होते. त्यांनी (दि. २६) सकाळी साडेनऊच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी सायली महाजन यांच्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी सागर गायकवाड व आकाश गायकवाड यांच्या विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात जीवनयात्रा संपविण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक भूषण सोनार अधिक तपास करीत आहेत.
सिडको (नाशिक) : इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको परिसरातील स्वामी विवेकानंदनगर परिसरात राहणारा सचिन गोरख दुधेकर याने शनिवारी (दि.२७) घरातील किचनमध्ये असलेल्या हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. सचिनच्या मामांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सचिनला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याबाबत अंबड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सचिनचे वडील दोन ते अडीच वर्षांपूर्वी वारलेले असून, आई भाजीविक्रीतून उदरनिर्वाह करते. तर सचिनचा मोठा भाऊ कंपनीत कामाला आहे.