नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या एमबीबीएस अभ्यासक्रमाचा सोमवारी (दि.9) पॅथालॉजी 1 विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरु होण्याआधीच व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (The question paper of the MBBS Pathology 1 subject conducted by the University of Health Sciences has gone viral even before the commencement of the examination)
विद्यापीठातील परीक्षा विभाग लिपीक किशोर दगडू जाेपळे यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीने सोमवारी (दि.9) एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पॅथलॉजी 1 या विषयाचा सेक्शन बी तील दिर्घ व लघु प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका सकाळी 11:30 च्या सुमारास व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाल्याचा मेल आला. याआधीही पेपर लिक झाल्याचा मेल आल्याने म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर सोमवारी (दि.9) पेपर लिक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पेपर लिक करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
परिक्षा सुरु होण्याआधी सुमारे एक तास आधीच प्रश्नपत्रिकांचे फोटो व्हाॅट्सअपवर व्हायरल झाले. सखोल तपासात 'युजी हॉस्टेल बॉइज 2022' या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रश्नपत्रिकेचे फोटो आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी ग्रुपमधील काही विद्यार्थ्यांची चौकशी केल्याचे समजते.