सिडको (नाशिक) : डॉनची धमकी देऊन दहशत पसरविणाऱ्या पाच जणांची अंबड पोलिसांनी घटनास्थळी जुने सिडकोत छत्रपती शिवाजी महाराज चौक व शॉपिंग सेंटर भागात धिंड काढत टवाळखाेरांची दहशत मोडीत काढली आहे.
जुने सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शॉपिंग सेंटर भागात सोमवारी (दि.11) रोजी सायंकाळी पाच जणांच्या टोळक्याने मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवत वाहनांच्या काचा फोडल्या, दुकानांची तोडफोड करून, एकाला जखमी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अंबड पोलिसांनी तत्पर कारवाई करत पाचही संशयितांना अटक केली आहे.
अटक झालेल्यांमध्ये स्वप्निल सुभाष कावले, गुड्डू उर्फ प्रेम एकनाथ सावंत, राहुल विठ्ठल पांलटे, सनी राचु आठवले (सर्व रा. इंदिरा गांधी वसाहत) आणि सुफियान सलीम शेख (रा. लेखानगर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.11) रोजी संध्याकाळी 7:30 वाजता आरोपींनी ‘परिस कलेक्शन’ या दुकानात लोखंडी गज घेऊन जबरदस्ती प्रवेश केला. त्यानंतर संशयितांनी दुकानमालक विकास गाणोरे यांना धारदार शस्त्राने धमकावत रोख रकमेची मागणी केली. त्यास विरोध केल्यामुळे विकास गाणोरे यांच्यासह सतीश तूपसमुद्रे यांनाही मारहाण करून गल्ल्यातील पैसे बळजबरीने काढून घेतले.
दरम्यान, आरोपींनी नागरिकांना आम्ही या एरियाचे डॉन आहोत, मध्ये पडलात तर संपवून टाकू, अशी धमकी दिली व रस्त्यावरील मालवाहतूक गाडीच्या काचा फोडल्या. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर संशयित आरोपींची जुने सिडकोत छत्रपती शिवाजी महाराज चौक व शॉपिंग सेंटर भागात धिंड काढण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बागुल पुढील तपास करीत आहेत. या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे.