नाशिक : जितेंद्र भावे व त्याच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शोरूममध्ये प्रवेश करून, बेकायदेशीररित्या फेसबुक लाइव्ह करून बदनामी केली.
फेसबुक लाइव्हवरील वाद मिटविण्यासाठी शोरूम मालकाकडे अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युसूफ सरदारखान पठाण (४३, रा. पखाल रोड, द्वारका) यांच्या फिर्यादीनुसार, चेतनानगर येथे महावीर व्हिल्स नावाचे शोरूम आहे. संशयित आरोपी दिगंबर पाठे याच्या वाहनाचा अपघात झाला होता. त्यामुळे त्याने वाहन (एमएच १५ जेसी ५५३८) दुरुस्तीसाठी शोरूममध्ये नेले होते. बुधवारी (दि. ९) दुपारी १२ वाजेच्या सुमारास निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे, राजेंद्र गायधनी व त्यांचे काही कार्यकर्ते दुरुस्तीच्या वाहनाचे स्पेअर पार्ट्स बदलण्यात आल्याचा आरोप करत शोरूममध्ये घुसले. संशयितांनी शोरूममध्ये जाताच मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण सुरू केले. त्यामुळे शोरूमची बदनामी होईल व ग्राहकांमध्ये अविश्वास निर्माण करण्याच्या हेतूनेच त्यांनी चित्रिकरण केले. तसेच जितेंद्र भावे याने फेसबुक पेजवर लाइव्ह केले.
त्यानंतर संशयितांनी, ‘सदरील प्रकरण मिटवायचे असेल तर आम्हाला अडीच लाख रुपये द्या, नाहीतर पुन्हा अशाच प्रकारे तक्रार घेऊन येऊ’ अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.