नाशिक : अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) अधिकारी असल्याचे भासवत ट्रकचालकांना लूटल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या गुन्ह्यात 'एफडीए'तील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सहभाग असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळला आहे. दरम्यान, अटकेतील तिघांनी या आधीही ट्रकचालकांना अधिकारी असल्याचे सांगत लूटल्याचे प्रकार समोर आले आहेत.
येवला टोल नाक्यावर रविवारी (दि. ११) पहाटे ५ वाजता संशयितांनी दोन ट्रकचालकांना अडवले होते. आम्ही एफडीएचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही ट्रक सातपूरमधील उद्योग भवनच्या आवारात आणले. त्यानंतर ट्रकचालकांकडील मोबाइल, रोकड, वाहनांची कागदपत्रे व चाव्या हिसकावून घेतल्या. त्यानंतर दोन्ही ट्रकमधील चालक व क्लीनर तीन दिवस ट्रकमध्येच बसून होते. कारवाई होत नसल्याने किंवा तपासणीसाठीही कोणी न आल्याने ट्रकचालक संभ्रमात होते. अखेर ट्रान्स्पोर्ट चालकाने नाशिक गाठत ट्रकचालकांकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ट्रान्स्पोर्ट चालकाने एफडीएच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत चौकशी केली असता या दोन ट्रकवर आम्ही कारवाई केली नसल्याचे सांगितले. त्यामुळे ही कारवाई तोतया अधिकाऱ्यांनी केल्याचे स्पष्ट झाले. सखोल चौकशीनंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करीत चारुदत्त त्र्यंबक भिंगारकर (३७, रा. अशोका मार्ग), मयूर अशोक दिवटे (३२, रा. बुधवार पेठ, जुने नाशिक) व नवीन अशोक सोनवणे या तिघांना पकडले.
पकडलेले तिघे संशयित अन्न व औषध विभागाचे खबरी असल्याचे समोर आले. तपासासाठी न्यायालयाने तिघांनाही शनिवारपर्यंत (दि.१७) पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यामध्ये एफडीएचा अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी असल्याचा संशय बळावला आहे. पोलिस आयुक्तालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, पकडलेले संशयित एफडीएच्या कार्यालयाच्या आवारात वावरत असायचे. त्यामुळे त्यांचा विभागातील व्यक्तीसोबत संपर्क असल्याने व त्यांची कार्यपद्धती जाणून घेत जबरी चोरी केल्याचा संशय वर्तवला जात आहे. तसेच या प्रकरणात राजकीय क्षेत्राशी निगडित काही व्यक्तींचाही समावेश असल्याचे बोलले जाते. संशयितांनी पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही तोतया अधिकारी बनून जबरी चोरी केल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने तपासास सुरुवात केली आहे.
विभागाबाबत होणारे आरोप चुकीचे आहेत. आमच्यापर्यंत पोलिसांकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. तसेच विभागांतर्गत कोणाचीही चौकशी केलेली नाही.महेश चौधरी, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक.