नाशिकरोड : किरकोळ वादातून नांदूर नाका येथे दोन युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या राहुल धोत्रे याचा उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. २९) सकाळी मृत्यू झाला. ही वार्ता पसरताच परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
गेल्या शुक्रवारी (दि. २२) जनार्दन नगर (नांदूर नाका) येथे सायंकाळच्या सुमारास दुचाकीचे चाक पायावरुन गेल्याच्या किरकोळ कारणावरुन वाद होऊन दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. यात राहुल धोत्रे व त्याचा भाऊ अजय कुसाळकर गंभीर जखमी झाले होते. तेव्हापासून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित आरोपी माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने निमसे यांना 29 ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र आता धोत्रेचा मृत्यू झाल्याने निमसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
धोत्रे कुटुंबीयांनी आक्रोश करत या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार माजी नगरसेवक निमसे व इतर संशयितांना तत्काळ अटक करा, अशी मागणी केली. ठोस कारवाईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने जिल्हा रुग्णालयात मोठा गदारोळ झाला.
घटनेनंतर माजी नगरसेवक निमसे यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद झाला होता. निमसे यांनी न्यायालयात धाव घेत, 29 ऑगस्टपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला होता. शुक्रवारी दुपारी या अर्जावर अंतिम सुनावणी होणार होती. मात्र सकाळीच धोत्रेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आडगाव पोलिसांनी खूनाचे कलम वाढविले. यामुळे आता निमसे यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना अटकेच्या कारवाईला सामोरे जावेच लागेल असे कायदेतज्ज्ञांनी सांगितले.
दरम्यान, निमसे हे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधार्थ गुन्हे शाखा तसेच आडगाव पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत. निमसे यांच्या मोबाईलच्या ‘सीडीआर’नुसार त्यांचा तपास घेत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पिसे यांनी सांगितले.
युवकांवर प्राणघातक हल्ल्यात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा सहभाग स्पष्टपणे दिसत असतानाही ठोस कारवाई झाली नसल्याचा मुद्दा अलीकडेच शिवसेनेने (उध्दव ठाकरे) पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला होता. निमसे यांच्यावर कारवाई न होण्यामागे यंत्रणेवर राजकीय दबाव असल्याचे दिसून येते. तक्रारदाराच्या कुटुंबावर सध्या राजकीय आणि गुंडांचा दबाव टाकला जात असल्याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले होते. ही घटना अतिशय गंभीर असून लोकप्रतिनिधी राहिलेली व्यक्ती स्वतः हल्ल्यात सहभागी होणे हा लोकशाही व्यवस्थेवर आघात आहे. अशा प्रकारे गुन्हेगारांना आश्रय देणे आणि सामान्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे असह्य असल्याचे ठाकरे गटाने म्हटले होते. माजी नगरसेवक निमसेंना तातडीने अटक करून आडगाव व परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
नाशिक रोड : जुन्या भांडणाची कुरापत काढून चेहेडी पंपिंग रोडवरील हनुमंत चौकात चौघांनी दोघा भावांवर हल्ला चढवत बेदम मारहाण केली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जगदीश पवार (श्रमिकनगर, चेहेडी) या युवकाने फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. 27) रात्री दहाच्या सुमारास हनुमान चौक येथे ऋतिक अडसुरे, संदीप माळी, चैतन गवारे, योगेश लोंढे (रा. चेहेडी पंपिंग) यांनी कुरापत काढून जगदीश व त्याचा आतेभाऊ सुनील हिरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. धारदार शस्त्राने मानेवर व डोक्यावर वार केले. तसेच त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या दीपक बोराडे व यश धोंगडे यांनाही बेदम मारहाण झाली. अधिकचा तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण कोरडे करीत आहेत.