सुरगाणा (नाशिक) : बरडा गावात किरकोळ वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन हिरामण परशराम चौधरी (33) याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 1) सायंकाळी घडली. या प्रकरणी बार्हे पोलिसांनी 12 संशयितांना ताब्यात घेत शुक्रवारी (दि. 2) त्यांना सुरगाणा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.
मृताची बहीण देवका विलास गुंबाडे (25, रा. गोपाळपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बरडा गावातील काही व्यक्तींमध्ये 30 एप्रिलला क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. दि. 1 मे रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास मारुती मंदिराच्या फरशीवर पुन्हा शाब्दिक चकमक होऊन वाद विकोपाला गेला होता. संशयित, योगीराज बाबूराव गुंबाडे, नरेंद्र किसन राऊत, भरत वाघमारे यांसह इतरांनी रागाच्या भरात हिरामणवर हल्ला केला. त्यात मंदिराच्या कौलाने डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्याचा मृत्यू झाला. संशयितांनी मृतदेह मनखेड - हस्ते रस्त्यावरील वनविभागाच्या रोपवाटिकेजवळ जांभळाच्या झाडीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसांना खबर मिळाल्यानंतर पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी रात्री शोधमोहीम राबवून 12 संशयितांना अटक केली. शुक्रवारी मृतदेह आप्तांच्या ताब्यात देण्यात आला. सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताने विरोधी गटातील मुलाला जिवे मारण्याची धमकी दिल्यातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.