नाशिक : शानू सैदाप्पा वाघमारे (२६) याचा मित्रांनी केलेल्या मारहाणीतच मृत्यू झाल्याचा आरोप करीत,·त्याच्या कुटुंबियांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात बुधवारी (दि. ३) आक्रोश केला. तसेच आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कुटुंबियांच्या मते, शानू याला त्याच्या मित्रांनी सोमवारी (दि. १) रात्री ८ वाजेच्या सुमारास घरातून नेले होते. त्यानंतर रात्रभर त्याला त्याच्या मित्रांनी मारहाण केल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात, मंगळवारी (दि. २) पहाटे ५ ते ५.३० च्या सुमारास राजीव गांधी भवनजवळील सिग्नलवरील एका दुकानासमोर शानू व त्याचे दोन मित्र आले होते. त्यांनी सुरक्षारक्षकाकडे तंबाखू मागितली. यातून त्यांच्यात वाद झाला. सुरक्षारक्षकाने मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र, वाघमारे याने पार्किंमध्ये असलेला लोखंडी पाइप उपसून तो उगारण्याचा प्रयत्न केला. अशात त्याच्या मित्रांनी त्याला ढकलले असता, तो कोसळला आणि बेशुद्ध पडला. मित्रांनीच त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले, असे समोर आले.
दरम्यान, बुधवारी (दि. ३) सकाळी ८ वाजेच्या सुमारास वाघमारे कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी करीत संशयितांवर कठोर कारवाई करावी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली. पोलिसांनी योग्य कारवाईबाबत विश्वास दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी परिसरात असलेल्या सराफी दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. तसेच शवविच्छेदन अहवाल देखील प्राप्त झाल्याची माहिती समोर येत आहे.