नाशिक : दोघा भावांच्या खुनप्रकरणी पकडलेले पाचही संशयित. समवेत गुन्हे शाखा युनिट एकचे पथक (छाया : हेमंत घोरपडे)
क्राईम डायरी

Nashik Murder | दोघा सख्ख्या भावांचा खून; संशयित गजाआड

आंबेडकर वाडी येथील घटना : पाच संशयितांना अटक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : परिसरातील वर्चस्ववाद आणि पुर्ववैमनस्यातून टोळक्याने दोघा सख्या भावांवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर वाडी परिसरात घडली. बुधवारी (दि. १९) रात्री ९.३० च्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात उमेश उर्फ मन्ना भगवान जाधव (३२) व प्रशांत भगवान जाधव (३०, दोघे रा. आंबेडकरवाडी) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. संशयित मारेकऱ्यांमध्ये दोघा सख्या भावांचा समावेश आहे.

सागर मधुकर गरड (३२, रा. आंबेडकरवाडी), अनिल विष्णू रेडेकर (४०, रा. उत्तरानगर), सचिन विष्णू रेडेकर (४४, रा. गायत्री नगर, नाशिक पुणे रोड), अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे (२६, रा. सर्वेश्वर चौक, उत्तमनगर) व योगेश चंद्रकांत रोकडे (३०, रा. आंबेडकर वाडी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. उमेश आणि प्रशांत जाधव यांचे मामा विनाेद पवार (रा. रविशंकर मार्ग) यांच्या फिर्यादीनुसार, पाचही संशयितांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बनकर चौकातील पिठाच्या गिरणीजवळ जाधव बंधू हे नितीन हटकर, मयूर भोये, आदित्य, विनोद पवार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नियोजनासंदर्भात चर्चा करत होते. त्यानंतर रात्री उमेश घरी जात होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी उमेशवर हल्ला केला. आरडाओरड झाल्याने प्रशांतने उमेशच्या बचावासाठी धाव घेतली. मात्र, संशयितांनी प्रशांतवरही हल्ला केला. हल्ला केल्यानंतर मारेकरी दुचाकींवर बसून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पाेलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलिस निरीक्षक संजीव फुलपगारे आदींनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस हवालदार विशाल काठे व नाईक मिलींदसिंग परदेशी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून पाचही संशयितांना छत्रपती संभाजी नगर रोडवरील डाळींब मार्केट परिसरातून पकडले. उमेश जाधव हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा शहर उपअध्यक्ष होता. दोन्ही मृत भावांच्या पश्चात आई व बहिण असा परिवार आहे.

परिसरासह जिल्हा रुग्णालयात तणाव

दोघा भावांना रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र, उपचारापूर्वीच दोघांचे मृत्यू झाले होते. घटनेची माहिती मिळताच आंबेडकरवाडी आणि जिल्हा रुग्णालयात नातलग, मित्रपरिवारासह समर्थकांनी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात तणावसदृष परिस्थिती होती. खबरदारी म्हणून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

पूर्ववैमनस्य, वर्चस्ववादातून खून

गत वर्षी मे महिन्यात संशयित सागर गरड याच्या फिर्यादीनुसार, उमेश व प्रशांत जाधव यांच्यासह इतरांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तर फेब्रुवारी २०२५ मध्ये संशयित सागर गरड यास घरात कारखाना सुरु करून भांगेच्या गोळ्या तयार करताना अंमली पदार्थ विराेधी पथकाने पकडले होते. जाधव आणि संशयित गरड यांच्यात वाद होते, तसेच परिसरात वर्चस्व ठेवण्यासाठीही छुपी स्पर्धा असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे संशयितांनी कट रचून दोघा भावांचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

20 दिवसांत सहा खून

शहरात १ ते २० मार्च दरम्यान, पाच घटनांमध्ये सहा जणांचा खून झाला आहे. त्यात गंगापूर येथे विवाहितेचा पतीने खून केल्याचे उघड झाले होते. तर म्हसरुळ येथे अनैतिक संबंधातून चौघांनी मिळून युवकाचे अपहरण करीत खुन केला. तर उर्वरीत तिन घटनांमध्ये वर्चस्ववाद आणि पुर्ववैमनस्यातून संशयितांनी चौघांचा खून केल्याचे पोलिस तपासात समाेर आले. त्यामुळे पुर्वीचा वाद किंवा वर्चस्व वाढवण्याच्या स्पर्धेतून शहरात खुन, खुनाचा प्रयत्न, हाणामारीसारखे प्रकार वाढत असल्याचे निष्पन्न होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT