नाशिक : भाचीच्या पतीला धारदार चाकुने भोसकून जीवे ठार मारणाऱ्या आरोपी मामाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीत २८ जुलै २०२३ मध्ये दुपारी ३ वाजून २० मिनिटांची ही घटना घडली होती.
शरणपूर रोड येथील महिला सुरक्षा विभागात संतोष अहिरे आणि त्यांची पत्नी पोर्णिमा अहिरे हे भरोसा कक्ष येथे समुपदेशनाकरिता आले होते. संतोष पंडीत अहिरे हे भरोसा कक्षाच्या दरवाजाजवळ उभे असताना पत्नीचा मामा आरोपी नानासाहेब नारायण ठाकरे (४०, रा. पंचशिल नगर, जीपीओ मागे, खंडेराव मंदिराजवळ, नाशिक) याने धारदार चाकुने संतोष यांच्या पोट आणि छातीवर वार केले होते. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन पोलिस निरीक्षक तुषार अढावू यांनी केला. त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून, जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
याप्रकरणी बुधवारी (दि. १०) पार पडलेल्या सुनावणीत न्यायाधिश आर. एन. पांढरे यांनी, फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीला जन्मठेपीची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेटकर यांनी युक्तीवाद केला. तसेच पोलिस उपनिरीक्षक अतुल पाटील, अंमलदार गणेश भोसले, कोर्ट अंमलदार रंजना गायकवाड यांनी गुन्ह्यात शिक्षा लागण्याच्यादृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.