नाशिक : गंगापूर रोड परिसरातील दोन अवैध सावकारांच्या घरांवर छापा टाकून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या पथकाने आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
फिर्यादी शैलेश अरविंद पोतदार (रा. विश्वकुंज सोसायटी, उदवनगर, पंचवटी) हे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक कार्यालयातील अधिकारी आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी एम. डी. इतेशम (रा. मुमताजमहल, वडाळा रोड) व सनी चंद्रकांत जाधव (रा. एकदंत सोसायटी, ध्रुवनगर) यांच्याविरोधात अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याचे तक्रार अर्ज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात प्राप्त झाले होते. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पथकाने दि. 8 मे रोजी सकाळी 9 च्या सुमारास गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कल येथे न्यू स्टार चिकन नावाचे दुकान व ध्रुवनगर येथील गंगापूर शिवारात एकदंत सोसायटीतील दोन्ही संशयितांच्या कार्यालयावर पथकाने छापा टाकला.
पथकाने केलेल्या चौकशीत व घरझडतीत आरोपींकडे आक्षेपार्ह कागदपत्रे मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली. तसेच कलम 16 च्या अहवालानुसार, अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याचे निष्कर्ष समोर आल्याने, त्यांच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.