मालेगाव (नाशिक) : शहर खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले. रविवारी (दि. 21) मध्यरात्री नया इस्लामपुरा भागात यंत्रमाग कामगार मोहंमद मतीन (21) याची निर्घृण हत्या करण्यात आली. या खुनानंतर काही तासांतच पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली.
सोमवारी (दि. 22) दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची (दि.24 सप्टेंबरपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली. या खुनाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. रमजानपुरा येथील रहिवासी मोहंमद मतीन हा एकबाल डाबीजवळील यंत्रमागावर काम करत होता. तो मध्यरात्री चहा घेण्यासाठी जवळच्या हॉटेलमध्ये गेला असता दोन व्यक्तींनी त्याचा मोबाइल हिसकावून पळ काढला. त्यानंतर कारखान्याकडे परतत असताना त्याच व्यक्तींनी पुन्हा त्याला गाठून धारदार शस्त्राने पोटावर वार केले. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आयेशानगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून, मृत मतीनच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयेशानगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून काही तासांतच संशयित सय्यद वसीम सय्यद सलीम उर्फ वस्या (21, रा. आयेशानगर) व रईस अहमद सईद अहमद उर्फ सईद काल्या (19, रा. जाफरनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली. या खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दररोज वाढणार्या मारामार्या, लूटमार आणि खुनांच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.