त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील टाकेहर्ष येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अभ्यासाची वही हरवली म्हणून शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील ही घटना असून या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केलीय. विद्यार्थ्याने होमवर्कची वही हरवल्यानं होम वर्क करून आणला नसल्याचं कारण शिक्षकांना सांगितलं. तेव्हा शिक्षकांनी तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पाठीवर छडीने मार दिला.
दरम्यान, विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गटशिक्षण अधिकारी सूर्यवंशी यांनी तातडीने टाकेहर्ष शाळेला भेट देऊन विद्यार्थ्याची विचारपूस केली. याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाला अहवाल सादर केला जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, या घटनेने पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, चिमुकल्यांना अमानुष मारहाण होत असेल तर शाळेत का पाठवायचे? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली आहे.