नाशिक : राजकारणातील गुन्हेगारी मोडून काढण्यात नाशिक पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेमुळे 'कर्णिक पॅटर्न'ची राज्यभर चर्चा होत आहे. लोंढे, बागूल टोळीच्या मुसक्या चहूबाजूने आवळल्याने, 'सफेदपोश' गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. दररोज पोलिसांकडून 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' या घोषणांचे व्हिडिओ समोर येऊ लागल्याने गल्लीबोळातील भाई-दादा गायब झाले आहेत. अजूनही गुन्हेगारांची लिस्ट तयार करण्याचे काम सुरूच असून, त्या लिस्टमध्ये शहरातील महिलेचे नाव समोर येत आहे. तिने राजकीय नेत्यांची नावे वापरून अनेकांना गंडविल्याचा पोलिसांना संशय असून, त्यांनी तपास सुरू केला आहे.
'कायद्यापुढे सर्व समान' या तत्त्वानुसार सध्या नाशिक पोलिस पुरुषांबरोबर महिला गुन्हेगारांच्या कृत्यांवरही बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यानुसार काठे गल्ली परिसरातील महिला पोलिसांच्या रडारवर आली असून, तिचे अनेक कारनामे समोर येत आहेत. तिने बड्या राजकीय नेत्याचे नाव वापरून अनेकांना गंडविल्याचा संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे हॉटेल व्यवसायात वरिष्ठ अधिकाऱ्याला भागीदार करीत तब्बल २३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचेही प्रकरण सध्या चर्चेत आहे.
ही महिला सध्या पोलिसांच्या रडारवर असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांशी जवळीकता बाळगून असल्याचा पोलिसांना संशय आहे. या महिलेने अनेकांना ब्लॅकमेल करीत पैसे उकळले असून, याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकने ऐन दिवाळीत सलग दोन दिवस तिची चौकशी केल्याचीही माहिती समोर येत आहे. जेव्हा या महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते, तेव्हा तिने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच ती बड्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला घेऊन पोलिसांसमोर हजर झाली. संबंधित पदाधिकाऱ्याने स्वतःची कशीबशी सुटका केल्यानंतर महिलेची चांगलीच त्रेधातिरपीट झाली. तिने पोलिसांना माफीनामा लिहून देत, स्वतःची सुटका करून घेतली.
रुग्णवाहिका चालकाला मारहाण
काही दिवसांपूर्वी या महिलेने रुग्णवाहिकेला अडवून चालकाला शिवीगाळ करीत भररस्त्यात मारहाण केल्याचाही प्रकार समोर आला होता. हे प्रकरण राजकीय हस्तक्षेपाने दाबले गेल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. तसेच मंत्र्याचे नाव वापरून तिने अनेकांची फसवणूक केली असून, महागड्या चारचाकीमध्ये फिरत आपले बड्या राजकारण्याशी थेट संबंध असल्याचे तिने अनेकांना भासविले आहे. तसेच या आधारे ब्लॅकमेलदेखील केले आहे. दरम्यान, या महिलेविरोधात पोलिस ॲक्शन मोडवर आल्याने, अनेक तक्रारदार तक्रारीसाठी पुढे येण्यास तयार असल्याची माहिती समोर येत आहे.