कळवण (नाशिक): पुणेगाव येथे सोमवारी (दि. ७) आयोजित ग्रामसभेत पेसा निधीच्या खर्चावरून वाद निर्माण झाला. विचारणा करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला पेसा समिती अध्यक्ष व त्याच्या दोघा भावांनी सभेदरम्यान बेदम मारहाण केली. या प्रकरणी संशयित तिघांविरोधात अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणेगाव येथे सोमवारी झालेल्या ग्रामसभेत पेसा निधीच्या तपशीलावरून वाद निर्माण झाला. ग्रामपंचायत सदस्य विश्वास गायकवाड यांनी निधीचा तपशील विचारल्यावर पेसा समितीचे अध्यक्ष रामा येवाजी पवार आणि त्यांच्या बंधूंनी गायकवाड यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे सभेत गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
विश्वास गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रामा पवार व त्यांच्या दोन भावांविरोधात अभोणा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलिस हवालदार वाघिरे करत आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पेसा निधीच्या वापरातील अनियमितता व गैरव्यवहाराबाबत गंभीर आरोप केले आहेत. विकासकामांचा दर्जा आणि खर्च याबाबत शंका व्यक्त करत ग्रामस्थांनी कामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.