नाशिकरोड : उपनगर पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगारांनी डोकेवर काढले असून, जयभवानी रोड येथील फर्नांडिसवाडीमध्ये दोन सराईत गुन्हेगारांच्या गटात हप्ता जमा करण्याच्या कारणावरून थेट गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. तसेच काही घरांवर दगडफेकही झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फर्नांडिसवाडी येथे बुधवारी (दि. 9) रात्री दोनच्या सुमारास राहुल उज्जैनवाला याच्या घराजवळ रोहित डिंगम ऊर्फ माले, टक्या ऊर्फ सनी पगारे, ईशाद चौधरी, बारक्या ऊर्फ श्रीकांत वाकोडे, सुशांत नाटे व त्यांचे तीन-चार साथीदार लाकडी दांडके, धारदार हत्यार घेऊन आले. रोहित डिंगम ऊर्फ माले व राहुल उज्जैनवाला यांच्यामध्ये टोळीच्या वर्चस्वावरून व हप्ता जमा करण्याच्या कारणावरून हमरीतुमरी होऊन वाद झाला. त्यानंतर दोघांनी एकमेकांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रोहित डिंगम व त्याच्या साथीदाराने उज्जैनवाला याची काकू वकील जस्लीन चहल यांच्या घरावरही दगडे व बिअरच्या बाटल्या फेकल्या. नंतर सर्व जण वाहनातून फरार झाले.
मध्यरात्री झालेल्या दोन्ही टोळ्यांतील वादविवादामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी पोलिसांना माहिती कळविल्यानंतर पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलिस निरीक्षक संजीव फुलपगारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना गावठी कट्ट्यातून झाडलेल्या गोळ्यांच्या पाच पुंगळ्या मिळून आल्या. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. दरम्यान, गुरुवारी संशयित सनी पगारे, इशाद चौधरी व सुशांत नाटे यांना ताब्यात घेतले आहे.
या भागात रोहित डिंग व राहुल उज्जैनवाल या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत. मागील काही महिन्यांपूर्वीदेखील या भागात गोळीबार झाला होता. तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला. मात्र, न्यायालयाने तो प्रस्ताव फेटाळल्याने न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्त केले होते.