वणी : परदेशात द्राक्ष निर्यात करणाऱ्या महिलेकडून 111 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या महिले विरोधात वणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वणी पोलीसांनी सदर महिलेस अटक केली आहे.
फिर्यादी दशरथ रामचंद्र जाधव (वय - ६५ रा. सोनजांब शिवार, ता.दिंडोरी, जि. नाशिक) यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. साक्षीदार यांचे शेतातील थॉम्सन प्रजातीचे द्राक्ष खरेदी करुन व्यवहारापोटी झालेले जाधव व साक्षीदार यांची ५४,८५,१५०/- रुपयाची फसवणूक झाली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हयातील मुख्य महीला आरोपी पुर्वा अनिल चव्हाण ही उच्च शिक्षीत असून गुन्हा घडल्यापासून देशात व परदेशात आपले अस्तित्व लपवून वास्तव्य करीत होती.
सदर महीलेला शोधण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांचे नेतृत्वाखाली महीला आरोपीच्या शोधार्थ पुणे, ठाणे, बंगलोर, तामिळनाडु आदी ठिकाणी तपास पथके पाठविण्यात आली. वणी पोलिस ठाण्याच्या पथकाने सदर पसार झालेल्या पूर्वा चव्हाण हिला दिल्लीतील इंदीरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ताब्यात घेतले. सदर महिला आरोपी विरोधात नाशिक जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात याच प्रकारे फसवणुक केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
दाखल गुन्ह्यामध्ये वणी पोलिस ठाण्यात दोन, लासलगाव, दिंडोरी, पिंपळगाव, वडनेर भैरव या ठिकाणी देखील गुन्हे दाखल आहेत. वणी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तहिलेचा शोध घेत ताब्यात घेतले. वणी पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक विजया पवार, गणेश कुटे, चंद्रभागा कराड, गिलबिले, प्रदीप बहीराम एन.जे.तेलंगे, किसन चौरे यांनी ही कामगीरी पार पाडली.
अशा प्रकारचे व्यापारी,अडत्या, दलाल यांचे अमिषाला बळी पडु नये. अशा प्रकारची द्राक्ष मालाबाबत फसवणुक झाली असल्यास संबंधीत पोलीस ठाण्या तक्रार नोंदवावी, असे आवाहन नाशिक ग्रामिण पोलिसांतर्फे सर्व नागरीकांना करण्यात आले आहे.