नाशिक : ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीचे प्रकार वाढत असून, त्यास उच्चशिक्षित मंडळी बळी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातील अशाच एका डॉक्टरास सायबर चोरट्यांनी तब्बल १६ लाखांचा गंडा घातला आहे.
पत्नीचे बँक खाते दुसऱ्या शाखेत वर्ग करण्यासाठी ऑनलाईन सर्च इंजिनवरुन बँकेच्या 'शाखा व्यवस्थापका'चा नंबर शाेधण्याच्या नादात हा सर्व प्रकार घडला. दरम्यान, संबंधित माेबाईल क्रमांकासह ज्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले, त्या खातेदाराविरुद्ध नाशिक शहर सायबर पाेलिसांत आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडाळा राेडवरील खाेडेनगर भागातील साॅलिटिएअर इमारतीजवळ ६४ वर्षीय डाॅक्टर हे पत्नीसह वास्तव्यास आहेत. दरम्यान, त्यांच्या पत्नीचे बँक खाते धुळे जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देवपूर शाखेत सुरु आहे. मात्र, त्यांना हे खाते देवपूर येथून नाशिकमधील शिवाजीनगर स्टेट बँकेच्या शाखेत वर्ग करुन सुरु करायचे हाेते. त्यासाठी डाॅक्टरांनी २ आणि ३ मे २०२५ राेजी माेबाईलवरुन ऑनलाइन पद्धतीने माहिती काढण्याचा प्रयत्न केला. यात बँक खाते वर्ग करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांनी 'गूगल क्राेम' सर्च इंजिनवरुन देवपूरच्या एसबीआय बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचा नंबर नंबर मिळविला. यानंतर ९३६५०६०३६६ हा नंबर मिळाल्यावर त्यांनी काॅल करुन बँक खाते वर्ग करण्याची पद्धती विचारली. तेव्हा वरील नंबरवरुन बाेलणाऱ्या अनाेळखी संशयिताने देवपूर एसबीआय शाखेचा व्यवस्थापक असल्याचे भासवून त्यांच्याकडून बँक खात्याची संपूर्ण माहिती मिळविली. डाॅक्टरांना प्राेसेस समजावून सांगचानाच संशयिताने बँक खाते ऑनलाइन पद्धतीने वर्ग करण्यास काही स्टेप असल्याचे सांगून मिळविलेल्या माहितीच्या आधारे डाॅक्टरांच्या रजिस्टर्ड माेबाईल नंबरवर काही ओटीपी(वन टाईम पासवर्ड) पाठविले. डाॅक्टरांकडून हे ओटीपी मिळवून त्यांच्या बँक खात्यातून थेट १६ लाख ६४ हजार ९९९ रुपये दुसऱ्या बँक खात्यांत वर्ग केले. बँक खात्यातून पैसे इतरत्र 'क्रेडीट' झाल्याचे कळताच डाॅक्टरांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी यानंतर बँक व सायबर पाेलीस ठाणे गाठून प्रकाराची माहिती दिली. तेव्हा त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार आता गुन्हा नाेंद हाेऊन तपास वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुभाष ढवळे करत आहेत.
डाॅक्टरांना पत्नीचे बँक खाते दुसऱ्या बँक खात्यात वर्ग करावयाचे हाेते. मात्र त्यांनी थेट जवळील बँकेत न जाता ऑनलाइन पद्धतीने बँक मॅनेजरचा संपर्क नंबर शाेधून काॅल केला. त्यामुळे बँक खाते वर्ग हाेण्याआधीच सायबर चाेरट्यांनी लक्ष करत त्यांचे बँक खात्यातील रक्कम वर्ग करुन गंडा घातला आहे. त्यामुळे डाॅक्टरांना माेठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.