नाशिक : ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी शहरातील गुंतवणूकदारांना मल्टी लेव्हल मार्केटींग (एमएलएम - Multi-Level Marketing Scams) पद्धतीने सुमारे ८१ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.
सिडकोतील पवननगर परिसरातील २५ वर्षीय महिलेच्या फिर्यादीनुसार, भामट्यांनी ८ नोव्हेंबर २०२४ ते ९ एप्रिल दरम्यान, गंडा घातला आहे. संशयितांमध्ये नाशिकच्याही लोकांचाही समावेश आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार, संशयित प्रसाद तडाखे, पवन उबाळे, समर्थ जगताप, खुशाल पवार, ओरीस कॉईन क्रिप्टो करन्सीचे भारतीय संचालक, राहुल खुराणा, अविनाश सिंग, रहव ठाकूर आदींनी महिलेस ओरीस कॉईन क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. करंसीत १ लाख ४० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास दरमहा ५ हजार रुपयांचा डिव्हीडंट मिळेल. तसेच तुम्ही इतर गुंतवणूकदारांनी तुमच्यामार्फत कंपनीत गुंतवणूक केल्यास त्यावचे कमिशन व सहलीचा लाभ मिळेल असे आमीष भामट्यांनी दाखवले. त्यानुसार २५ वर्षीय महिलेने गुंतवणूक करीत तिच्या भावासह ओळखीच्यांनाही गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यामुळे शहरातील ३६ गुंतवणूकदारांनी ८१ लाख १६ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र संशयितांनी महिलेसह इतर गुतंवणूकदारांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक परतावा दिला नाही. तसेच गुंतवलेले पैसेही परत केले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिसांकडे संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यातील चार संशयित नाशिकचे असल्याचे समजते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांना सुमारे वर्षापासून गंडा घालण्यात येत होता. सुरुवातीस गुंतवणूकदारांना आर्थिक परतावा दिला. मात्र त्यानंतर परताव मिळेनासा झाला. फसवणूक करणारे फसवणूक झालेले नागरिक सिडको परिसरातीलच रहिवासी असल्याचे समजते. सायबर पोलिसांनी तपास सुरु केला असून फसवणूक झालेल्यांचे जबाब नोंदवले आहेत.
मल्टी लेव्हल मार्केटींग प्रकारात गुंतवणूकदारांचा पिरॅमीड करण्यात येतो. एकाने गुंतवणूक करण्यासोबतच त्याच्या ओळखीतील तीन ते चार जणांना गुंतवणुकीस प्रोत्साहित करावे. त्यानंतर त्या तीन ते चार जणांनी इतरांना गुंतवणूकीस प्रोत्साहित करण्यास सांगितले जाते. अशा प्रकारे एका योजनेत ओळखींच्या व्यक्तींकडून लाखो-करोडो रुपये गोळा केले जातात. मात्र या योजनेचे मुख्य पात्र कधी समोर येत नसल्याने फसवणूक झाल्यानंतर नातलग-मित्रपरिवारात आर्थिक कारणांवर वाद झाल्याचे प्रकार घडतात.