नाशिक : कॉलेज रोडलगत असलेल्या संत कबीरनगर परिसरात शनिवारी (दि. ८) रात्री टोळक्याने १७ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केला. अरुण रामलू बंडी (रा. कामगारनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा संशयितांना अटक केली असून, एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच इतर तिघांचा शोध सुरू आहे.
'तू आमच्या एरियात यायचं नाही आणि आम्हीही तुझ्या एरियात येणार नाही' या वादातून टोळक्याने अरुणचा खून केल्याचा पोलिस तपासात उलगडा झाला आहे. या प्रकरणात सहा संशयितांचा सहभाग समोर आला असून, नेहमीच्या वादाला कंटाळून संशयितांनी हत्याराने अरुणच्या डोक्यावर वार करत त्याचा खून केला. पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने विलास काटे (१८) आणि ओम खंडागळे (१८, दोघे रा. संत कबीरनगर) या दोघांना अटक केली असून, एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेतले आहे. अन्य तिघा संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, गंगापूर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिस तपासात अरुण आणि मारेकऱ्यांमध्ये पूर्वीपासून वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी दुपारी त्यांच्यात वाद झाल्यानंतर संशयितांनी अरुणचा शोध घेतला, पण तो न मिळाल्याने ते परतले. रात्री अरुण संत कबीरनगरमध्ये आल्याची माहिती मिळताच त्याला घेरून हल्ला केला आणि दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गंगापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रात्री उशिरापर्यंत तिघा संशयितांना अटक केली. अरुणचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर तेथेही गर्दी झाली, त्यामुळे सरकारवाडा पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
गंभीर वार झाल्याने अरुणचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी हल्लेखोराच्या दुचाकीसह अरुणच्या दुचाकीची तोडफोड केल्याचे समोर आले. घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरात तातडीने दंगल नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले. रात्रभर असलेला बंदाेबस्त सकाळी शिथिल करण्यात आला.