नाशिक : सातपूर येथील राजवाडा परिसरात पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याचे शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री घडली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात समोर आले. सिंधूबाई दिलीप पिठे (४८, रा. राजवाडा, सातपूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिचा पती दिलीप पिठे (५२) यास पाेलिसांनी सकाळी ताब्यात घेतले.
पोलिस तपासानुसार, पिठे दाम्पत्याचा २९ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पतीच्या मद्यपानाच्या सवयीमुळे त्यांच्या नात्यात वाद निर्माण होत असत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. सततच्या वादांमुळे मागील तीन वर्षांपासून ते विभक्त राहत होते. सिंधूबाई या मुलांसह राजवाड्यात भाड्याच्या खोलीत राहत होत्या. काही दिवसांपूर्वी मुलांच्या मध्यस्थीमुळे दोघे पुन्हा एकत्र आले होते. मात्र, दिलीप यांचे व्यसन तसेच सुरू होते. गुरुवारी (दि.8) रोजी रात्री मद्यसेवन केल्यानंतर दिलीप यांनी सिंधूबाईंसोबत वाद घातला. संतप्त होऊन त्यांनी सिंधूबाईंचा धारदार शस्त्राने गळा चिरला आणि घटनास्थळावरून पळ काढला. रात्रपाळीवरून घरी परतलेल्या मुलाला ही घटना लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, सातपूरचे प्रभारी पोलिस निरीक्षक रणजीत नलावडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सुरू आहे.