नाशिक : १६ फेब्रुवारी ते २९ मार्च दरम्यान कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या डोंबिवली जवळच्या दावडी गावात नाशिकमधील तरुणीवर अत्याचार करणाऱ्या संशयित रिलस्टार तथा विकासक सुरेंद्र पांडूरंग पाटील (५३) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पाथर्डी फाटा परिसरातील एका लॉजवर तो लपून बसला होता. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
इन्स्टाग्रामवर एका तरुणीशी ओळख झाल्यानंतर संशयित सुरेंद्र पाटील याने तिला नोकरीचे आमिष दाखविले. मुंबई विमानतळावर तुला नोकरीस लावून देतो असे सांगून त्याने तिला त्याच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर बंदूक दाखवून तिच्या आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच बंदुकीच्या धाकावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे संबंधित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, तरुणींच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात त्याच्यावर लैंगिक अत्याचार व शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता.
इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला तो पाथर्डी फाटा परिसरातील एका लॉजवर लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी लॉजवर छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या. इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या आदेशाने गुन्हे शोथ पथकाचे उपनिरीक्षक संतोष फुंदे, सागर परदेशी, दीपक शिंदे, योगेश जाधव यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
संशयित सुरेंद्र पाटील हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत. नाशिकमधील तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासात आणखी एका घटस्फोटीत महिलेने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एका तरुणीने देखील त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सुरेंद्र पाटील हा वादग्रस्त असून, भोंदुबाबाच्या उपस्थितीत पैशांचा पाऊस, नोटांची उधळण, पोलिस ठाण्यातील खुर्चीवर बसून रिल काढणे अशा विविध कारणांमुळे तो चर्चेत असतो.