नाशिक : विद्यार्थिनींकडे शरीरसुखाची मागणी करीत प्राचार्यने विनयभंग केल्याची संतापजनक घटना द्वारका सर्कल येथील गणपतराव आडके इन्स्टिट्यूट, कॉलेज ऑफ नर्सिंग येथे घडली.
चार विद्यार्थिनींनी तक्रार केल्यानंतर भद्रकाली पोलिस ठाण्यात प्राचार्याविरोधात विनयभंग, पोक्सोसह ॲट्राॅसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी प्राचार्यास अटक केली असून, त्याला सोमवार (दि. २)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
डॉ. प्रवीण सुरेश घोलप (४०, रा. पाथर्डी शिवार) असे गुन्हे दाखल झालेल्या संशयित प्राचार्याचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनींनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३० सप्टेंबर २०२४ पासून ही घटना घडली आहे. अल्पवयीन पीडितांनी केलेल्या आरोपानुसार, संशयित घोलप याने कॉलेजमध्ये वेळोवेळी विनयभंग करीत शरीरसुखाची मागणी केली. पीडित मुली अनुसूचित जमातीतील असल्याचे माहिती असूनदेखील घोलप याने विनयभंग केला. घोलप याच्या कार्यालयात तसेच कॉलेजच्या आवारात पीडित मुलींना वेगवेगळे गाठून शरीरसुखाची मागणी करीत शरीराला स्पर्श करीत होता. त्यामुळे पीडिता भयभीत झाल्या होत्या. त्यापैकी काही पीडिता घरी गेल्यानंतरही प्राचार्य घोलप याने त्रास दिल्याचे समजते. त्यामुळे पीडितेने ही आपबिती मैत्रिणींना सांगितल्यानंतर त्यांनाही प्राचार्याने त्रास दिल्याचे सांगितले.
अखेर पीडितांनी घरच्यांकडे प्राचार्याची तक्रार केली व त्यानंतर भद्रकाली पोलिस ठाणे गाठून प्राचार्य प्रवीण घोलप विरोधात फिर्याद दिल्या. त्यानुसार घोलप विरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार चार गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांचा तपास सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव करीत आहेत. सोमवारी घोलप यास पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.