नाशिक : पंजाबमधील संशयित गुन्हेगारास गावठी कट्टा आणि जीवंत काडतुसांसह पकडल्यानंतर त्याने नाशिकमधील एकाच्या खुनाची सुपारी घेतल्याचे पोलिस तपासात उघड झाले. त्यामुळे पालघर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नाशिक गाठले आहे. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहासह ज्याच्या खुनाची सुपारी घेतली होती त्या युवकाकडेही पोलिस तपास करणार असल्याचे समजते. तसेच सुपारी घेणाऱ्या शुभम सिंग याच्या विरोधात दाखल गुन्ह्यांत कलम वाढवण्यात आल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली.
पालघर पोलिसांनी शुभम सिंग यास पकडल्यानंतर केलेल्या चौकशीत शुभम हा नाशिकला काही दिवस राहत असल्याचे उघड झाले. तसेच त्याने नाशिकमधील राहुल मच्छिंद्र पवार (रा. गंगापूर गाव) या युवकाच्या खुनाची सुपारी घेतल्याचे समोर आले. सखोल तपासात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद असलेले परमिंदर उर्फ गौरव राजेंद्र सिंग आणि आशिष राजेंद्र जाधव यांनी राहुलच्या खुनाची सुपारी दिल्याचे उघड झाले. राहुल पवार याने दहा वर्षांपूर्वी आशिषच्या भावाचा खुन केल्यामुळे आशिष राहुलचा खून करण्यासाठी प्रयत्नात होता.
२०२३ मध्येही सातपूर येथील कार्बन नाका परिसरात आशिषने इतर सहकाऱ्यांसह मिळून राहुल व तपन जाधव या दोघांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यामुळे नाशिकरोड कारागृहातून भावाच्या मारेकऱ्याची 'सुपारी' देण्यासाठी संशयितांनी पंजाबमधील गुन्हेगाराचा वापर केल्याने पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे. दुसरीकडे नाशिकरोड कारागृह प्रशासनानेही संशयित आशिष व परमसिंग यांची चौकशी केली. दोघेही एकाच बॅरेकमध्ये आहेत. या दोघांनी राहुलच्या खुनाची सुपारी कशी, कोणामार्फत दिली याचा उलगडा झाला नसल्याने पालघर पोलिसांनी सखोल तपासास सुरुवात केली आहे.
संशयित शुभम सिंग याच्याविरोधात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल होता. त्यात कलम वाढवण्यात आले असून पालघर पोलिस नाशिकला पाठवण्यात आले आहे. ते नाशिकरोड कारागृहात व राहुल पवार याच्याकडे चौकशी करतील.बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक, पालघर पोलिस