नाशिक : अवघ्या दहाच दिवसांत पाच जबरी घरफोड्यांच्या घटनांनी शहर हादरले आहे. दिवसाढवळ्या घरफोड्या केल्या जात असल्याने, चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. घरफोडीच्या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला जात असून, अपवादवगळता काही प्रकरणांचा तपास मात्र संथगतीने सुरू असल्याचे दिसून येते.
अंबडच्या महालक्ष्मी नगरमधील श्री ज्वेलर्स सराफ दुकान गेल्या आठवड्यात दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकावर लुटले गेले. तपास सुरू असतानाच नाशिक रोडच्या शिखरेवाडीत माजी नगरसेवकांच्या घरात धाडसी घरफोडी होऊन २८ तोळे दागिने व १६.५ लाखांची रोकड लंपास करण्यात आली. दिवसाढवळ्या होणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा तपास संथ असल्याने चोरट्यांना अभय मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. मागील काही घरफोड्यांचे गूढ उकलले नसल्याने चोरटे निर्ढावले आहेत. नागरिक पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपींना अटक करण्याची मागणी करत आहेत.
चोरट्यांकडून रेकी केली जात असल्याचे मागील काही घटनांमधून उघड झाले आहे. ज्या घरात चोरी करायची आहे, तेथील संपूर्ण माहिती चोरटे प्राप्त करून घेतात. त्या घरातील व्यक्ती, त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा, परिसरातील रहदारी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या आदी माहिती चोरटे घेतात. चोरट्यांच्या या पद्धतीमुळे त्यांचा छडा लावताना पोलिसांचीदेखील दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे.
घरफोडीच्या घटनांमधील म्हाेरके हे परराज्यातील असल्याचेही मागील काही घटनांमधून स्पष्ट होत आहे. विशेषत: उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यातील चोरट्यांची संख्या अधिक असून, स्थानिक सराईतांच्या मदतीने ते घरफोड्या करीत आहेत. घरफोडीतील ऐवज घेऊन ते लगेच त्यांच्या राज्यात पोबारा ठोकत असल्याने, पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
१० फेब्रुवारी – पेठ रोड येथील बिअर बारमधून ७० हजारांचे मद्य आणि रोख रक्कम चोरी.
११ फेब्रुवारी – कोणार्कनगर, आडगाव येथे भरदिवसा घरफोडी; ४० हजारांचे दागिने चोरी.
१५ फेब्रुवारी – श्रीकृष्णनगर, मखमलाबाद येथे बंगल्यात घरफोडी; ६.४० लाखांचे दागिने व रोख लंपास.
१७ फेब्रुवारी – अंबड येथे सराफ दुकानावर सशस्त्र दरोडा; १६ लाखांहून अधिक किमतीचे दागिने चोरी.
१९ फेब्रुवारी – नाशिक रोड, शिखरेवाडी येथे माजी नगरसेवकाच्या घरात घरफोडी; २८ तोळे दागिने आणि १६ लाखांची रोकड चोरी.
परजिल्हा अन् परराज्यात जाऊन पोलिस चोरट्यांच्या मुसक्या आवळत आहेत. परजिल्हा आणि परराज्यातील चोरटे स्थानिक सराईतांना हाताशी धरून गुन्हे करीत आहेत. मात्र, ‘सीसीटीव्ही’मुळे ते लगेच जाळ्यात अडकत आहेत. शहरात आतापर्यंत दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, पाचशे कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. तसेच ज्या भागात घरफोडीची घटना घडली, त्याची माहिती ‘लोकल सुरक्षित नाशिक’ या अॅपवर अपलोड करून त्या भागात पेट्रोलिंग वाढवली जात आहे.प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, नाशिक.