नाशिक : गंगापूर रोडवरील सिरीन मीडोज येथील रहिवासी भक्ती अथर्व गुजराथी (३३) यांनी दि. १९ मे रोजी जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी गुंडाविरोधी पथकाने तपास करीत भक्तीचा पती व सासू- सासऱ्यास अटक केली. पतीचे विवाहबाह्य संबंध आणि मद्यसेवन करून होणारा त्रास तसेच सासू- सासऱ्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून भक्तीने जीवनयात्रा संपविल्याचे समोर आले आहे.
भक्ती यांनी राहत्या घरी गळफास घेतला होता. याप्रकरणी त्यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले (६१, रा. येवला) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात जावई अथर्व योगेश गुजराथी (रा. सिरीन मीडोज), सासरे योगेश मणीलाल गुजराथी व सासू मधुरा (दोघे रा. नवीन पंडित कॉलनी) यांच्याविरुद्ध फिर्याद नोंदवली. गुन्हा दाखल होताच तिघे पसार झाले होते.
गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने संशयितांचा माग काढला. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून गुजरात राज्यातील नवसारी येथे तिघे पळून गेल्याची माहिती मिळवली होती. त्यानुसार पथकातील अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, प्रवीण चव्हाण यांनी शनिवारी (दि. २४) रात्री नवसारी गाठून अथर्व व योगेश गुजराथी यांना अटक केली. त्यापैकी अथर्व हा गुजरात वनविकास मंडळाच्या गेस्ट हाउस येथून, तर योगेश गुजराथी यास वासंदा शहरातील हॉटेलमधून ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यापासून तिघे संशयित स्वतंत्र राहून लपत होते. तिघांचा ताबा गंगापूर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. तिघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
भक्ती आणि अथर्व यांच्यात १७ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांच्या विरोधानंतरही त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर अथर्वचे देश- विदेशातील अन्य महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो आणि अनैतिक संबंध उघडकीस आल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. भक्तीला तिची सासू मधुरा हिचाही विरोध होता. सततच्या वादांमुळे भक्ती दोन- अडीच महिने माहेरी राहिली आणि आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच सासरी परतली होती. भक्तीच्या आत्महत्येनंतर पती, सासरे आणि सासू नवसारीला पळून गेले होते. भक्तीने विधी शाखेचे शिक्षण घेतले होते.
भक्ती गुजराथी हिच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या पती व सासू सासरे यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. मुलाचा ताबा भक्तीच्या आई- वडिलांकडे दिला आहे. भक्तीच्या कुटुंबाच्या मागणीनुसार हा खटला लढण्यासाठी सरकारी वकील सुधीर कोतवाल यांची नियुक्ती करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. हा खटला 'फास्ट ट्रॅक'वर चालविण्यासह संशयितांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.चित्रा वाघ, आमदार, भाजप
शवविच्छेदन अहवालानुसार भक्ती यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट आहे. तिने व्हॉटसॲपवरून तिचा भाऊ व मैत्रिणींना तिला होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल चर्चा केली आहे. त्या चॅटिंगसह इतर तांत्रिक पुराव्यांद्वारे पुढील तपास करीत आहोत.पद्मजा बढे, सहायक पोलिस आयुक्त, नाशिक.