सिन्नर / वावी (नाशिक) : तालुक्यातील शहा येथे तडीपार गुंड भय्या उर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर (28) याची राहत्या घरात शिरून कोयता, कुऱ्हाड, लोखंडी रॉडने जबर मारहाण करून हत्या करण्यात आली. शनिवारी (दि. 26) सकाळी 10.30 च्या सुमारास ही घटना घडली.
मृत भय्या कांदळकरची आई विजया गोरक्षनाथ कांदळकर (44) यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिसांनी 14 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सायंकाळी उशिरा चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जुन्या वादातून कांदळकरची हत्या झाल्याची चर्चा आहे. कांदळकर गेल्या दोन वर्षांपासून तडीपार होता. तडीपारीची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तो शुक्रवारी (दि. 25) शहा येथे राहत्या घरी आला होता. शनिवारी (दि. 26) सकाळी 10.15 च्या सुमारास संशयित सौरभ गोराणे, दिनेश वाळीबा गोराणे, वाळीबा गोराणे, शरद दिगंबर गोराणे, विजय दिगंबर गोराणे, सचिन गोरख बागल, राहुल गोरख बागल, अतुल अशोक गोराणे, आबा गोटीराम गोराणे, रवींद्र गोटीराम गोराणे, वैभव विलास गोराणे, दगू साप्ते अस्तगावकर, गणेश सोनवणे, सर्जेराव रघुनाथ गोराणे (सर्व रा. शहा, ता. सिन्नर) असे जवळपास 17 ते 18 जण कांदळकरच्या घराजवळ आले होते. भय्या कांदळकर आम्हाला धमकी देतो म्हणून अगोदर घर पेटवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर घरात लपून बसलेल्या भय्याला शोधून त्याच्या डोक्यात, मानेवर, नाका-तोंडावर, हातापायावर कोयता, कुऱ्हाड, लोखंडी रॉडने जबर मारहाण करत घराच्या बाहेर फेकून दिले. त्यानंतर टोळके घटनास्थळावरून फरार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मृत कांदळकरची आई विजया व वडील गोरक्षनाथ कांदळकर यांनाही मारेकऱ्यांनी मारहाण केली.
दरम्यान, कांदळकर कुटुंबीयांनी जखमी अवस्थेत भय्याला वावी पोलिस ठाण्यात व तेथून सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तथापि, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. रुग्णालयात कांदळकरचे मित्र, नातेवाइकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी उशिरा शवविच्छेदनासाठी मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
वावीचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शहाजी शिंदे अधिक तपास करीत आहेत.
भय्या उर्फ प्रवीण कांदळकर हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, अपहरण, विनयभंग, लूटमार यासारखे जवळपास 19 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली. त्यामुळेच त्याला दोन वर्षे तडीपारही करण्यात आले होते. शहा येथील गोराणे कुटुंबीय आणि भय्या कांदळकर यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वाद होते. त्यातूनच काटा काढल्याची चर्चा आहे.