नाशिक : फ्लॅट परत करण्याची मागणी तसेच पोलिसांकडे दाखल तक्रार अर्ज मागे घेण्याच्या मोबदल्यात एकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे व इतरांविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी २ जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान, खंडणीची मागणी करीत दमदाटी केल्याचा आरोप आहे.
भावेसह इतर सहकाऱ्यांविरोधात याआधी महिलांना अपशब्द वापरणे, खंडणी, विनयभंग, ॲक्ट्रोसिटी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर मुंबईनाका पोलिस ठाण्यात अशोकामार्ग येथील रहिवासी राजेंद्र दामोदर बोडके यांनी खंडणीची फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, संशयित भावेसह नितीन विष्णु जाधव, प्रविण विष्णु जाधव, सचिन विष्णु जाधव व इतर सहा ते सात जणांनी बोडके यांच्याविरोधात खाेटा तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी पाच लाख रुपये व फ्लॅट परत करण्याची मागणी संशयितांनी केली. तसेच संशयित प्रविण जाधव याने बोडके यांच्या नातलगाच्या मोबाइलवर वारंवार फोन करून पैशांची मागणी करीत धमकी दिली. संशयितांनी बोडके कुटूंबियांच्या फोटोचे पोस्टर तयार करून त्यावर बदनामीकारक मजकूर लिहून फेसबुक पेजवर व्हिडीओ टाकून समाजात बदनामी केली. तसेच हा व्हिडीओ डिलीट करण्यासाठी बोडके यांच्याकडून दोन लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.