सिडको (नाशिक) : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून छुप्या पद्धतीने अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या संशयिताला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. सिडकोतील लेखानगर परिसरात ही कारवाई करण्यात आली असून आरोपीकडून तब्बल ८३ हजार २६० रुपये किमतीचा ४ किलो १६३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेला आरोपी आकाश आत्रम (वय २८, रा. गोंडवाडी झोपडपट्टी, फुलेनगर, पेठ रोड, नाशिक) असा आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस नाईक भुषण सोनवणे व चारूदत्त निकम यांना माहिती मिळाली होती की, आरोपी आकाश आत्रम हा गांजाची छुप्या पद्धतीने विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने लेखानगर परिसरात सापळा रचून आरोपीस गांजासह ताब्यात घेतले.
आरोपीविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ च्या कलम ८ (क) व २० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्याला अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
खंडणी विरोधी पथकाचे जग्वेंद्रसिंग राजपूत, दिलीप भोई, दिलीप सगळे, भूषण सोनवणे, मंगला जगताप, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, रविंद्र दिघे, मंगेश जगझाप, चारूदत्त निकम, भगवान नाधव, भरत राऊत, अनिरुद्ध येवले यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.